Homeताज्या बातम्या

इच्छाशक्ती आजही तितकीच सक्षम; ओमप्रकाश चालीकवार यांना निवृत्त करण्याचा विचार नाही – खा. चव्हाण

ज्येष्ठ उद्योजक, चित्रपट वितरक आणि दैनिक सत्यप्रभाचे संस्थापक-संपादक ओमप्रकाश चालीकवार यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त, सुवर्ण विवाहमहोत्सव आणि

अशोकराव चव्हाणांच्या खंद्या समर्थकाचे नाव चर्चेत; ‘निष्ठावंतांना’ पुन्हा डावलणार?
पंचतारांकित सहलीवरून बीड-नांदेडच्या राजकारणात कलगीतुरा, लोकशाहीचा रंगला बाजार!
नांदेड-पुणे एक्स्प्रेस हडपसरऐवजी मुख्य स्थानकापर्यंत न्या;’वंदे भारत स्लिपर’ मराठवाड्यातून चालवा: खा. अशोकराव चव्हाण



ज्येष्ठ उद्योजक, चित्रपट वितरक आणि दैनिक सत्यप्रभाचे संस्थापक-संपादक ओमप्रकाश चालीकवार यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त, सुवर्ण विवाहमहोत्सव आणि सौ. नंदाताई चालीकवार यांच्या 65 व्या वाढदिवसानिमित्त आयोजित गौरव सोहळ्यात माजी मुख्यमंत्री तथा खा.अशोकराव चव्हाण यांनी चालीकवार यांच्या कार्याचा गौरव करत, त्यांना निवृत्त करण्याचा आमचा अजून विचार नाही. त्यांची इच्छाशक्ती, कार्यक्षमता आणि जबाबदारी पार पाडण्याची क्षमता आजही तितकीच सक्षम आहे, असे गौरवोद्गार काढले.
नांदेड येथील हॉटेल मध्ये झालेल्या या कार्यक्रमात छायाचित्रकार विजय होकर्णे प्रस्तुत ’कर्तृत्वाचा प्रवास’ या ओमप्रकाश चालीकवार यांच्या जीवनावर आधारित चरित्रात्मक माहितीपटाचे प्रकाशन आणि प्रथम प्रदर्शन खा.अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गुरुवर्य एकनाथ महाराज (साधू), माजी मंत्री डी. पी. सावंत, माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर, आमदार अमर राजूरकर, ज्येष्ठ विचारवंत तथा पत्रकार मधुकर भावे आणि नांदेडच्या महापौर कविता मुळे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना खा. अशोकराव चव्हाण म्हणाले की, आपल्या राजकीय आणि सामाजिक प्रवासात ओमप्रकाश चालीकवार यांचे योगदान मोलाचे राहिले आहे. टुरिंग टॉकीजपासून आधुनिक वातानुकूलित चित्रपटगृहांपर्यंतचा त्यांचा प्रवास संघर्ष, दूरदृष्टी आणि चिकाटीचा आदर्श आहे. मराठवाड्यात चित्रपट वितरण क्षेत्राची भक्कम पायाभरणी करण्याबरोबरच पत्रकारिता, सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रातही त्यांनी उल्लेखनीय कार्य केले असून, आजच्या तंत्रज्ञानाच्या युगातही त्यांची कार्यतत्परता प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले. माजी मंत्री डी. पी. सावंत यांनी चालीकवार यांच्या सामाजिक बांधिलकीचा गौरव केला, तर ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी त्यांच्या कष्ट, प्रामाणिकपणा आणि माणुसकीच्या बळावर उभ्या राहिलेल्या कार्याचा विशेष उल्लेख केला. सत्काराला उत्तर देताना ओमप्रकाश चालीकवार यांनी हा सन्मान आपल्या कुटुंबीय, मित्र, सहकारी आणि हितचिंतकांचा असल्याची भावना व्यक्त केली. संघर्ष, कष्ट आणि माणुसकीच्या आधारावर हा प्रवास घडल्याचे सांगत, सर्वांचे प्रेम व आशीर्वाद कायम लाभावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमात प्रदर्शित झालेल्या ’कर्तृत्वाचा प्रवास’ या माहितीपटाला उपस्थितांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. समाजासाठी कार्य करणार्‍या व्यक्तिमत्त्वांचे जीवनकार्य पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी अशा चरित्रात्मक माहितीपटांची गरज असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

COMMENTS