नांदेड : नांदेड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे उमेदवार अमरनाथ राजुरकर यांच्या विजयावर जवळपास शिक्कामोर्तब

नांदेड : नांदेड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे उमेदवार अमरनाथ राजुरकर यांच्या विजयावर जवळपास शिक्कामोर्तब झाल्याचे चित्र स्पष्ट झाले असून, भाजप नेते तथा माजी मुख्यमंत्री तथा खा. अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आखण्यात आलेल्या अचूक राजकीय रणनीतीने विरोधकांची सर्व गणिते विस्कळीत झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
निवडणुकीच्या प्रारंभापासूनच महायुतीने ‘प्रत्येक मतदार, प्रत्येक तालुका आणि प्रत्येक समीकरण’ या सूत्रावर भर देत प्रचाराची दिशा निश्चित केली. केवळ सभा आणि घोषणांवर अवलंबून न राहता स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रत्येक मतदाराशी सातत्याने संपर्क साधण्यात आला. त्यामुळे मतदानापूर्वीच महायुतीने मजबूत आघाडी घेतल्याचे चित्र निर्माण झाले होते. खा. अशोकराव चव्हाण यांनी स्वतः संपूर्ण निवडणुकीवर बारकाईने लक्ष ठेवत तालुकानिहाय समन्वय साधला. मतदारांच्या नाराजीची कारणे दूर करणे, अपक्ष आणि छोट्या पक्षांना विश्वासात घेणे तसेच स्थानिक पातळीवरील राजकीय समीकरणांना योग्य दिशा देणे, या सर्व बाबींमध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचे मानले जात आहे. महायुतीच्या राजकीय रणनीतीतील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे विविध विचारांचे घटक एकत्र बांधून ठेवण्यात मिळालेले यश. भारतीय जनता पक्ष, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेससह मराठवाडा जनहित पक्ष आणि इतर मित्रपक्षांची उभारलेली भक्कम मोट हीच अमरनाथ राजुरकर यांच्या विजयाची प्रमुख ताकद ठरल्याचे बोलले जात आहे.
निवडणुकीदरम्यान विरोधकांकडून अनेक राजकीय दावे आणि प्रतिदावे करण्यात आले. मात्र, महायुतीने कोणत्याही वादात न पडता संघटनात्मक ताकदीवर आणि सूक्ष्म नियोजनावर भर दिला. मतदारांशी थेट संवाद, समन्वयकांची यंत्रणा, नगरसेवकांच्या नियमित बैठका आणि प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याची आखणी यामुळे महायुतीचा पाया अधिक मजबूत झाला. राजकीय जाणकारांच्या मते, मतदानापूर्वीच महायुतीने आवश्यक संख्याबळ सुरक्षित केले होते. त्यामुळे मतदान प्रक्रिया ही केवळ औपचारिकता ठरल्याचे बोलले जात आहे. अमरनाथ राजुरकर यांना विक्रमी मताधिक्य मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, अब की बार 400 पार हा नारा प्रत्यक्षात साकार होण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत. विशेष म्हणजे, निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात काही राजकीय घडामोडींनी विरोधकांना धक्का दिला. महायुतीने संयम, संपर्क आणि समन्वयाच्या जोरावर आपली बाजू अधिक मजबूत केली. त्यामुळे निकालाची औपचारिक घोषणा बाकी असली तरी राजकीय वर्तुळात अमरनाथ राजुरकर यांच्या विजयावर शिक्कामोर्तब झाल्याची भावना व्यक्त होत आहे.
दरम्यान, नांदेड विधान परिषद निवडणूक ही केवळ एका उमेदवाराच्या विजयापुरती मर्यादित न राहता खा. अशोकराव चव्हाण यांच्या संघटन कौशल्याची आणि महायुतीच्या एकजुटीची मोठी राजकीय परीक्षा मानली जात होती. या परीक्षेत महायुतीने सरशी केल्याचे चित्र दिसत असून, अमरनाथ राजुरकर यांचा विजय हा आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठीही महायुतीसाठी नवी राजकीय ऊर्जा देणारा ठरणार असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.

COMMENTS