नायगाव तालुक्यात निकृष्ट दर्जाच्या व कमी उगवणक्षमतेच्या सोयाबीन बियाण्यांमुळे हजारो शेतकर्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवल्याचा आरोप करत संबंधित बि

नायगाव तालुक्यात निकृष्ट दर्जाच्या व कमी उगवणक्षमतेच्या सोयाबीन बियाण्यांमुळे हजारो शेतकर्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवल्याचा आरोप करत संबंधित बियाणे उत्पादक कंपन्या, वितरक आणि विक्रेत्यांविरुद्ध फसवणुकीचे गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेस (शरदचंद्र पवार) नायगावचे तालुकाध्यक्ष गजानन पाटील होटाळकर यांनी तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, यावर्षी मान्सून उशिरा दाखल झाल्यानंतर शेतकर्यांनी मोठ्या प्रमाणावर सोयाबीनची पेरणी केली. मात्र इनोव्हेस-108, इनोव्हेस महादेव, बूस्टर बियाणे, एसकेबी बियाणे, जेएस बियाणे, परवशा बियाणे, रवी बियाणे, व्हिगोर बियाणे, श्री श्री बियाणे, सफल बियाणे, ज्ञानदीप बियाणे आणि अंकुर बियाणे या कंपन्यांच्या बियाण्यांची उगवण अत्यंत कमी झाली किंवा अनेक ठिकाणी उगवणच झाली नाही. त्यामुळे शेतकर्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत असून दुबार पेरणीचा अतिरिक्त खर्च सहन करावा लागत आहे. बियाणे कायदा, 1966 आणि बियाणे नियम, 1968 मधील तरतुदींचे उल्लंघन करून निकृष्ट दर्जाचे बियाणे बाजारात विक्रीस आणल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. संबंधित कंपन्या, वितरक आणि विक्रेते यांची सखोल चौकशी करून दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, तसेच बाधित शेतकर्यांना प्रथम पेरणी, दुबार पेरणी, बियाणे, मजुरी आणि इतर खर्चाची योग्य नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, ज्या शेतकर्यांच्या शेतातील सोयाबीन बियाण्यांची उगवण झाली नाही, त्यांनी तातडीने तालुका कृषी अधिकारी, नायगाव यांच्याकडे अर्ज सादर करावा. अर्जासोबत बियाणे खरेदीची पावती, बियाण्याच्या पोत्यावरील ओळख पट्टी (टॅग) आणि आवश्यक कागदपत्रे जोडून तक्रार नोंदवावी, असे आवाहन गजानन पाटील होटाळकर यांनी केले आहे.

COMMENTS