Homeताज्या बातम्या

भारताची रशियन तेल आयात विक्रमी पातळीवर

नवी दिल्ली : जागतिक पातळीवरील भू-राजकीय घडामोडी, आखाती प्रदेशातील तणाव आणि ऊर्जा पुरवठ्याबाबत निर्माण झालेल्या अनिश्‍चिततेच्या पार्श्‍वभूमीवर भार

ईडी आमच्यासाठी नवीन नाही – मंत्री अशोक चव्हाण (Video)
ऋतुराज गडाखांच्या राजकीय भेटी वाढल्या
घरोघरी अधिकारी अभियान’ अंतर्गत मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी मतदारयादी पडताळणी


नवी दिल्ली : जागतिक पातळीवरील भू-राजकीय घडामोडी, आखाती प्रदेशातील तणाव आणि ऊर्जा पुरवठ्याबाबत निर्माण झालेल्या अनिश्‍चिततेच्या पार्श्‍वभूमीवर भारताने जून महिन्यात रशियाकडून कच्च्या तेलाची आयात मोठ्या प्रमाणात वाढवली आहे. विविध देशांकडून तेल खरेदीचे धोरण अवलंबत भारताने ऊर्जा सुरक्षेला प्राधान्य दिल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.जून महिन्यात भारताची रशियाकडून होणारी कच्च्या तेलाची आयात विक्रमी पातळीवर पोहोचली आहे. रशिया हा भारताचा सर्वात मोठा तेलपुरवठादार देश म्हणून कायम असून, सवलतीच्या दरात उपलब्ध होणारे तेल भारतीय कंपन्यांसाठी अद्यापही आकर्षणाचे केंद्र ठरत आहे.
तज्ज्ञांच्या मते, होर्मुझ सामुद्रधुनीतील अडथळे आणि आखाती देशांकडून पुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता लक्षात घेऊन भारतीय शुद्धीकरण कंपन्यांनी आगाऊ नियोजन करत तेलसाठा वाढविण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे रशियासह संयुक्त अरब अमिरातीकडूनही मोठ्या प्रमाणात तेल खरेदी करण्यात आली. जून महिन्यात रशियाकडून दररोज सरासरी सुमारे 26 लाख 60 हजार बॅरल कच्च्या तेलाची आयात झाली. मे महिन्यात हा आकडा 19 लाख 10 हजार बॅरल इतका होता. यावरून एका महिन्यात झालेली वाढ लक्षणीय असल्याचे दिसून येते. संयुक्त अरब अमिरातीकडूनही भारताने मोठ्या प्रमाणावर तेल खरेदी केली. जूनमध्ये दररोज सुमारे 6 लाख 36 हजार बॅरल तेल आयात करण्यात आले. सौदी अरेबिया आणि व्हेनेझुएला यांच्याकडूनही भारताने तेल खरेदी कायम ठेवली असून पुरवठ्याचे विविध स्रोत उपलब्ध ठेवण्याच्या धोरणावर भर दिला आहे. दुसरीकडे, अमेरिकेकडून होणार्‍या तेल आयातीत मात्र मोठी घट झाली आहे. मे महिन्याच्या तुलनेत जूनमध्ये अमेरिकन तेलाची खरेदी लक्षणीयरीत्या कमी झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे भारताने सध्याच्या परिस्थितीत खर्च, उपलब्धता आणि पुरवठा स्थिरता यांचा विचार करून आयात धोरण आखल्याचे दिसून येते. भारत हा जगातील प्रमुख ऊर्जा आयातदार देशांपैकी एक असून कच्चे तेल, द्रवीकृत नैसर्गिक वायू आणि द्रवीकृत पेट्रोलियम वायू यासाठी मोठ्या प्रमाणात परदेशी पुरवठ्यावर अवलंबून आहे. विशेषतः आखाती देश भारताच्या ऊर्जा गरजांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. अलीकडेच इराण आणि इतर देशांमधील तणावामुळे होर्मुझ सामुद्रधुनीतील वाहतुकीवर परिणाम झाला होता. जगातील मोठ्या प्रमाणावरील तेलवाहतूक या समुद्री मार्गातून होत असल्याने त्याचा जागतिक बाजारावर परिणाम झाला. मात्र, तणाव कमी झाल्यानंतर तेलवाहू जहाजांची वाहतूक पुन्हा सुरू झाली असून परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत आहे.

COMMENTS