राज्यात उन्हाचा कडाका आता जीवघेणा ठरू लागला आहे. विदर्भात सूर्य अक्षरशः आग ओकतोय. अकोला शहराचा पारा रविवारी तब्बल ४६.९ अंशांवर पोहोचला असून, हे श

राज्यात उन्हाचा कडाका आता जीवघेणा ठरू लागला आहे. विदर्भात सूर्य अक्षरशः आग ओकतोय. अकोला शहराचा पारा रविवारी तब्बल ४६.९ अंशांवर पोहोचला असून, हे शहर जगातील सर्वाधिक उष्ण शहरांपैकी एक ठरले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, राज्यात उष्माघाताने दोन बळी गेल्याची माहिती समोर आली आहे.
अकोल्यात या मोसमातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली असून पुढच्या दोन दिवसात हा विक्रम मोडीत निघण्याची भीती आहे. केवळ अकोलाच नाही, तर नागपूर ४५.४ अंश आणि वर्ध्यात ४६.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. उष्णतेच्या या भीषण लाटेमुळे नागपूरमध्ये उष्माघाताचा पहिला बळी गेला आहे, तर लातूरमध्ये एका २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.
वर्ध्याच्या तापमानानेही गेल्या काही वर्षांतील उच्चांक मोडला आहे. झाडांची कत्तल आणि वाढत्या सिमेंटीकरणामुळे वर्ध्यात नागरिक हैराण झाले आहेत. दुसरीकडे, नागपूरमध्ये व्यापाऱ्यांनी ग्राहकांना दिलासा देण्यासाठी दुकानाबाहेर चक्क तुषार फवारे (Misting System) लावले आहेत, जेणेकरून तापमान ७ ते ८ अंशांनी कमी राखता येईल.
विदर्भापाठोपाठ उत्तर महाराष्ट्रातही परिस्थिती गंभीर आहे. नाशिकचा पारा सातत्याने ४१ अंशांच्या पार जात आहे. आज सकाळी किमान तापमान २४.३ अंश नोंदवले गेले असून दिवसभर नाशिककरांना उन्हाचे चटके सोसावे लागणार आहेत.
मे आणि जून महिने अजून शिल्लक असतानाच एप्रिलमध्येच जनजीवन विस्कळीत झाले आहे. प्रशासनाने नागरिकांना सकाळी ११ ते संध्याकाळी ५ या वेळेत काम नसेल तर घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. वाढते तापमान केवळ चिंतेची बाब नाही, तर ती आता धोक्याची घंटा बनली आहे.

COMMENTS