Homeताज्या बातम्यामुंबई - ठाणे

अमेरिकेचे सैन्य इराणमधून घेणार लवकरच माघार; दोन-तीन आठवड्यांत सैन्य परतवण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा

वॉशिंग्टन : पश्‍चिम आशियातील तणावाच्या पार्श्‍वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी महत्त्वपूर्ण घोषणा करत इराणमधील लष्करी उपस्थि

‘होर्मुझ’ खुली होताच कच्च्या तेलाच्या किमतीत 11 टक्क्यांची घसरण
आखातात युद्धाचा भडका! इराणकडून भारतीय खलाशी असलेल्या टँकरवर गोळीबार
अमेरिका-इराण चर्चेला पुन्हा खीळ; अधिकार्‍यांनी पाकिस्तान दौरा केला रद्द

वॉशिंग्टन : पश्‍चिम आशियातील तणावाच्या पार्श्‍वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी महत्त्वपूर्ण घोषणा करत इराणमधील लष्करी उपस्थिती कमी करण्याचे संकेत दिले आहेत. पुढील दोन ते तीन आठवड्यांत अमेरिकन सैन्य माघारी बोलावले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, या काळात हवाई कारवाया सुरूच राहतील, असेही त्यांनी नमूद केले.
व्हाईट हाऊसमधील कार्यक्रमात बोलताना ट्रम्प यांनी सांगितले की, इराणमधील लष्करी मोहिमेचे उद्दिष्ट जवळपास पूर्ण झाले आहे. आम्हाला आता तेथून बाहेर पडायचे आहे आणि ते लवकरच घडेल, असे ते म्हणाले. इंधनाच्या वाढत्या किंमतींचा संदर्भ देत त्यांनी दावा केला की अमेरिकेची माघार झाल्यानंतर जागतिक बाजारात दर कमी होण्यास मदत होईल. अमेरिकेच्या कारवाईला प्रत्युत्तर म्हणून इराणने अत्यंत महत्त्वाच्या होर्मुझ या सामुद्रधुनीतील हालचालींवर मर्यादा आणल्याचे वृत्त आहे.
या मार्गातून मोठ्या प्रमाणात जागतिक तेल वाहतूक होते. या पार्श्‍वभूमीवर ट्रम्प यांनी इतर देशांना स्वतःची ऊर्जा गरज भागवण्यासाठी स्वतंत्र पावले उचलण्याचे आवाहन केले. कोणत्याही देशाला तेल किंवा वायू घ्यायचा असेल, तर त्यांनी स्वतः या मार्गाचा वापर करावा. त्यात काही अडचण निर्माण झाली, तर त्याची जबाबदारी अमेरिकेवर राहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. इराणकडून अमेरिकन कंपन्यांना संभाव्य धोका असल्याच्या चर्चांवर प्रतिक्रिया देताना ट्रम्प यांनी असा धोका अतिशयोक्त असल्याचे म्हटले. इराणकडून कोणत्याही मोठ्या हल्ल्याची ठोस चिन्हे नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच इराणकडे अण्वस्त्रे नसल्याचा दावा करत त्यांनी परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगितले. ट्रम्प यांच्या मते, इराणमध्ये सध्याचे नेतृत्व पूर्वीपेक्षा अधिक मवाळ आणि चर्चेसाठी तयार आहे. त्यामुळे करार झाला नाही, तरी अमेरिकेचे मुख्य उद्दिष्ट इराणने अण्वस्त्र विकसित करू नये हे साध्य करणे महत्त्वाचे आहे. हे उद्दिष्ट पूर्ण झाले, तर कराराशिवायही अमेरिका माघार घेईल, असे त्यांनी नमूद केले. मात्र, इराण स्वतः करार करण्यास इच्छुक असल्याचेही त्यांनी सूचित केले. पुढील काळात इराणने अण्वस्त्र कार्यक्रम पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न केल्यास कठोर कारवाईचा इशाराही ट्रम्प यांनी दिला. त्यांच्या मते, सध्याची परिस्थिती तुलनेने स्थिर असून धोका कमी झाला आहे.


अमेरिकेचे सैन्य मैदानात उतरण्याची शक्यता कमी
अमेरिकेचे संरक्षणमंत्री पीट हेगसेथ यांनीही या भूमिकेला दुजोरा देत सांगितले की, होर्मुज सामुद्रधुनी खुली ठेवण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करण्यात आले आहेत. आगामी काही दिवस संघर्षाच्या दृष्टीने निर्णायक ठरणार असून अमेरिकन स्थलसेना थेट युद्धात उतरवण्याची शक्यता कमी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. एकूणच, अमेरिकेच्या माघारीच्या संकेतांमुळे पश्‍चिम आशियातील घडामोडींना नवे वळण मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

COMMENTS