नवी दिल्ली : देशभरातील वाहनचालकांना इंधन दरवाढीचा आणखी एक फटका बसला असून, संकुचित नैसर्गिक वायूच्या (सीएनजी - CNG) दरात पुन्हा वाढ करण्यात आली आह

नवी दिल्ली : देशभरातील वाहनचालकांना इंधन दरवाढीचा आणखी एक फटका बसला असून, संकुचित नैसर्गिक वायूच्या (सीएनजी – CNG) दरात पुन्हा वाढ करण्यात आली आहे. २६ मेपासून प्रति किलो २ रुपयांनी दर वाढविण्यात आल्याने राजधानी दिल्लीतील नवीन दर ८३ रुपये ९ पैसे प्रति किलोवर पोहोचले आहेत.
गेल्या १५ मेनंतर अवघ्या ११ दिवसांत ही चौथी दरवाढ ठरली आहे. यापूर्वी १५ मे रोजी २ रुपये, १८ मे रोजी १ रुपया आणि २३ मे रोजी १ रुपयांची वाढ करण्यात आली होती. नव्या वाढीसह या कालावधीत सीएनजी तब्बल ६ रुपयांनी महागला आहे. दरवाढीचा सर्वाधिक परिणाम दिल्ली आणि आसपासच्या परिसरातील वाहनचालकांवर होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या भागात रिक्षा, टॅक्सी, शालेय वाहने तसेच खाजगी वाहनांमध्ये मोठ्या प्रमाणावर सीएनजीचा वापर केला जातो. सततच्या दरवाढीमुळे रोजच्या उत्पन्नावर परिणाम होत असल्याची नाराजी रिक्षामान्यांनी व्यक्त केली आहे.
इंधन महागल्याने वाहतूक खर्च वाढण्याबरोबरच सर्वसामान्यांच्या घरगुती खर्चावरही अतिरिक्त ताण येण्याची शक्यता आहे. मालवाहतूक आणि प्रवासी वाहतुकीचे दर वाढल्यास त्याचा परिणाम दैनंदिन वस्तूंच्या किमतींवरही होऊ शकतो, अशी भीती व्यक्त होत आहे.
दरम्यान, मध्यपूर्वेतील तणावपूर्ण परिस्थितीमुळे इंधन पुरवठ्यावर परिणाम होत असल्याचे सांगितले जात आहे. होर्मूझ सामुद्रधुनी परिसरातील हालचाली आणि जहाज वाहतुकीवरील अडथळ्यांमुळे जागतिक बाजारात इंधनाच्या किमती वाढत असल्याचे मानले जात आहे. काही दिवसांपूर्वीच पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली होती. त्यानंतर आता सीएनजीही महागल्याने वाहनचालकांची चिंता वाढली आहे.

COMMENTS