दक्षिण अमेरिकेतील व्हेनेझुएला देशाला बुधवारी सायंकाळी सलग दोन शक्तिशाली भूकंपांचे धक्के बसले. या भीषण नैसर्गिक आपत्तीमुळे राजधानी काराकाससह


दक्षिण अमेरिकेतील व्हेनेझुएला देशाला बुधवारी सायंकाळी सलग दोन शक्तिशाली भूकंपांचे धक्के बसले. या भीषण नैसर्गिक आपत्तीमुळे राजधानी काराकाससह अनेक भागांत मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून हजारो नागरिक बेघर झाले आहेत. या भूकंपात तब्बल दहा हजारांहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. परिस्थितीची कमालीची गांभीर्य लक्षात घेऊन सरकारने देशात राष्ट्रीय आणीबाणी (National Emergency) घोषित केली आहे.
७.२ आणि ७.५ रिश्टर स्केल तीव्रतेचे धक्के
अमेरिकेच्या भूवैज्ञानिक सर्वेक्षण संस्थेच्या (USGS) माहितीनुसार, पहिला भूकंप रिश्टर मापनपद्धतीवर ७.२ तीव्रतेचा नोंदवला गेला. त्याचे केंद्र कॅरिबियन किनारपट्टीवरील मोरॉन शहराच्या पश्चिमेस, काराकासपासून सुमारे १६८ किलोमीटर अंतरावर आणि जमिनीखाली १३ किलोमीटर खोलीवर होते. या धक्क्यानंतर काही मिनिटांतच ७.५ तीव्रतेचा दुसरा मोठा धक्का बसला. या दुसऱ्या भूकंपाचे केंद्र मोरॉन शहराच्या नैऋत्येस सुमारे सोळा किलोमीटर अंतरावर आणि दहा किलोमीटर खोलीवर होते.
अनेक इमारती कोसळल्या; ढिगाऱ्यांचे साम्राज्य
भूकंपामुळे राजधानी काराकासमधील अनेक इमारतींना मोठे तडे गेले असून काही ठिकाणी संपूर्ण इमारती कोसळल्याची माहिती मिळाली आहे. अलतामिरा परिसरात निवासी आणि व्यापारी इमारतींचे मोठे नुकसान झाले. अनेक नागरिक भीतीपोटी रस्त्यावर आणि मोकळ्या जागांमध्ये आश्रय घेत आहेत. काही भागांत धुळीचे मोठे लोट उठल्याने बचावकार्यात अडथळे निर्माण झाले आहेत. या भूकंपानंतर प्युर्तो रिको आणि व्हर्जिन बेटांसाठी समुद्रलाटांचा (Tsunami) धोक्याचा इशारा देण्यात आला असून किनारी भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम सुरू आहे.
इमारतींमध्ये प्रवेश टाळण्याचे गृहकाऱ्यांचे आवाहन
देशाचे गृहमंत्री डियाोसदादो काबेलो यांनी नागरिकांना मोकळ्या जागेत राहण्याचे आवाहन केले आहे. भूकंपानंतरचे धक्के (Aftershocks) पुन्हा बसण्याची शक्यता असल्याने आधीच बाधित झालेल्या इमारतींमध्ये प्रवेश टाळावा, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच रुग्णवाहिका आणि आपत्कालीन सेवांना मार्ग मोकळा करून देण्याचे आवाहन वाहनचालकांना करण्यात आले आहे. सरकारी यंत्रणा युद्धपातळीवर मदत आणि बचावकार्य राबवत असून जखमींना तातडीने उपचारासाठी हलविण्यात येत आहे. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि विशेष गरज असलेल्या व्यक्तींना प्राधान्याने सुरक्षित स्थळी पोहोचवण्याचे काम सुरू आहे.
विमान आणि रेल्वे सेवा स्थगित; शाळांना सुट्टी
दरम्यान, देशातील महत्त्वाच्या मायकेटिया आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या इमारतीचा काही भाग कोसळल्याने विमानसेवा तात्पुरती बंद करण्यात आली आहे. विमानतळाच्या संरचनेचे मोठे नुकसान झाल्याचे प्रशासनाने सांगितले. रेल्वे आणि महानगर रेल्वे सेवाही पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात आली आहे. कार्यवाहू राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिगेज यांनी दूरचित्रवाणीद्वारे जनतेला संबोधित करत राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा केली. शाळा आणि महाविद्यालयांमधील वर्ग पुढील काही दिवसांसाठी बंद ठेवण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. आपत्तीग्रस्त कुटुंबांप्रती संवेदना व्यक्त करत सरकार त्यांच्या पुनर्वसनासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल, असे त्यांनी सांगितले.
अमेरिकेसह अनेक देशांचा मदतीचा हात
या भीषण संकटानंतर अमेरिकेसह अनेक देशांनी व्हेनेझुएलाला मदतीचा हात पुढे केला असून आंतरराष्ट्रीय मदत संस्थाही बचावकार्यात सहभागी होण्याची तयारी दर्शवत आहेत. तथापि, मृत्यू आणि नुकसानीचे नेमके चित्र समोर येण्यासाठी आणखी काही काळ लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

COMMENTS