Homeताज्या बातम्या

NEET प्रश्नपत्रिका गैरव्यवहार प्रकरणात आणखी दोघांना अटक; एक डॉक्टर तर दुसरा प्राध्यापक, आतापर्यंत १३ आरोपी ताब्यात

पुणे/नवी दिल्ली : वैद्यकीय प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षेच्या (NEET UG 2026) प्रश्नपत्रिका गैरव्यवहार प्रकरणात के

अहिल्यानगर जिल्ह्यात आज ‘नीट’ची पुनर्परीक्षा  ५ हजार ३८५ विद्यार्थी प्रविष्ट  ; १२ केंद्रांवर होणार परीक्षा
22 लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात पेपर लीक प्रकरणात सीबीआय चौकशी करा- नितीन सोनवणेभारत सरकारचे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या
नीट परीक्षा रद्द करण्याची नामुष्की !

पुणे/नवी दिल्ली : वैद्यकीय प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षेच्या (NEET UG 2026) प्रश्नपत्रिका गैरव्यवहार प्रकरणात केंद्रीय तपास संस्था म्हणजेच सीबीआयने (CBI) बुधवारी आणखी दोन संशयितांना ताब्यात घेतले. यामध्ये लातूर येथील एक डॉक्टर आणि पुण्यातील एका प्रशिक्षण संस्थेतील प्राध्यापकाचा समावेश आहे. या कारवाईनंतर या प्रकरणातील अटक आरोपींची संख्या आता तेरा झाली आहे.

तपास यंत्रणेच्या माहितीनुसार, डॉ. मनोज शिरोळे याला सीबीआय माफीचा साक्षीदार करणार होते, मात्र त्याचा थेट सहभाग आढळून आल्यामुळे त्याला अटक करण्यात आली आहे. डॉ. मनोज यांनी एका कोचिंग सेंटरच्या मालकाच्या (जो स्वतःही आरोपी आहे) मुलासह ३ विद्यार्थ्यांना आरोपी पी. व्ही. कुलकर्णी यांच्याकडून केमिस्ट्रीच्या (रसायनशास्त्र) प्रश्नपत्रिका मिळवून दिल्या होत्या. तर, दुसऱ्या आरोपीचे नाव तेजस हर्षदकुमार शाह असे आहे. तो पुणे येथील ‘डॉ. अभंग प्रभू मेडिकल अकॅडमी’ या कोचिंग सेंटरमध्ये फिजिक्सचा (भौतिकशास्त्र) प्राध्यापक आहे. त्याला NEET UG 2026 परीक्षेतील फिजिक्सचे लीक झालेले प्रश्न अटकेत असलेल्या आरोपी मनिषा हवालीदार कडून मिळाले होते.

केंद्रीय तपास यंत्रणा या संपूर्ण प्रकरणामागील साखळी उलगडण्याचा प्रयत्न करत आहे. आतापर्यंत देशातील विविध भागांमध्ये एकूण ४९ ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. या कारवाईदरम्यान अनेक कागदपत्रे, संगणक, भ्रमणध्वनी (मोबाईल) आणि अन्य इलेक्ट्रॉनिक साधने जप्त करण्यात आली आहेत. तपासात या प्रश्नपत्रिकांची विक्री पाच राज्यांमध्ये झाल्याचे समोर आले आहे. त्यात महाराष्ट्रातील व्यवहारांचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे सांगितले जात असून, राजस्थानचा क्रमांक त्यानंतर लागतो. तपास अधिकाऱ्यांच्या मते, या गैरव्यवहाराची व्याप्ती आणखी मोठी असण्याची शक्यता नाकारता येत नाही. किती विद्यार्थ्यांनी प्रश्नपत्रिका विकत घेतल्या, याचा शोध अद्याप सुरू आहे. तपास यंत्रणेला महाराष्ट्र आणि राजस्थानमध्ये प्रश्नपत्रिकांच्या प्रती तयार करून त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवल्याचे पुरावे मिळाले आहेत. महाराष्ट्रातूनच इतर राज्यांमध्ये तथाकथित प्रश्नसंच पोहोचवण्यात आल्याचा संशय आहे. याप्रकरणी आता आर्थिक व्यवहारांचीही छाननी सुरू झाली आहे. काही पालकांच्या बँक खात्यांतून आरोपी शिवराज मोटेगावकर, पी. व्ही. कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या खात्यांमध्ये रक्कम वर्ग झाल्याची माहिती तपास यंत्रणेला मिळाली आहे. त्यामुळे आणखी काही जण संशयाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

परीक्षा शुल्क परताव्यासाठी नोंदणी सुरू राष्ट्रीय परीक्षा संस्थेने (NTA) विद्यार्थ्यांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून दिली आहे. रद्द झालेल्या परीक्षेच्या शुल्क परताव्यासाठी उमेदवारांना आपल्या बँक खात्याचा तपशील नोंदविण्यासाठी विशेष संकेतव्यवस्था सुरू करण्यात आली आहे. ही सुविधा २७ मे रोजी रात्री उशिरापर्यंत उपलब्ध राहणार आहे. दरम्यान, ही परीक्षा ३ मे रोजी देशातील ५५१ शहरांमध्ये तसेच परदेशातील १४ केंद्रांवर घेण्यात आली होती. जवळपास तेवीस लाख विद्यार्थी परीक्षेला बसले होते. परीक्षेनंतर काही दिवसांतच गैरव्यवहाराची माहिती समोर आल्यानंतर हे प्रकरण केंद्रीय तपास यंत्रणेकडे सोपवण्यात आले. त्यानंतर १२ मे रोजी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

COMMENTS