Homeताज्या बातम्या

‘कोण प्रतापराव? मी ओळखत नाही’ म्हणणाऱ्यांना आता राष्ट्रवादीमधील पाबळे आडनावाचा आधार घ्यावा लागला!

लोकसभेतील निवडणुकीत झालेला पराभव चिखलीकर साहेब विसरणार का? नांदेड : नांदेड जिल्ह्यातील राजकारणात सध्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर

राजकीय रंगमंचावर मैत्रीचे सूर; संगीत संध्येत विरोधकांच्या गप्पांची रंगली मैफल
अशोकराव चव्हाणांच्या खंद्या समर्थकाचे नाव चर्चेत; ‘निष्ठावंतांना’ पुन्हा डावलणार?
नांदेड विधानपरिषद रणसंग्राम : चव्हाणांचे ‘चाणक्य’ राजूरकर हॅट्रिकच्या उंबरठ्यावर; महायुतीतील छुप्या संघर्षाचीही चर्चा

लोकसभेतील निवडणुकीत झालेला पराभव चिखलीकर साहेब विसरणार का?

नांदेड : नांदेड जिल्ह्यातील राजकारणात सध्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नव्या घडामोडींना वेग आला असून, महायुतीतील नेत्यांमधील संबंध, राजकीय संवाद आणि निवडणुकीनिहाय बदलणारी भूमिका यावर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. विशेषतः भाजपचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर आणि भाजपचे खासदार अशोकराव चव्हाण यांच्यातील राजकीय संबंधांचा विषय पुन्हा एकदा केंद्रस्थानी आला आहे.

लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर अशोकराव चव्हाण यांनी प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्याशी असलेले दीर्घकालीन राजकीय वैमनस्य संपल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे नांदेडमधील भाजप अधिक मजबूत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, लोकसभा निवडणुकीत देशभरात भाजपला मोठे यश मिळाले असताना नांदेडमध्ये काँग्रेसचे वसंतराव चव्हाण विजयी झाले. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीतही भाजपचे उमेदवार डॉ. संतुकराव हंबर्डे यांना पराभवाचा सामना करावा लागला. विशेष म्हणजे लोकसभा आणि पोटनिवडणुकीतील अपयशाच्या पार्श्वभूमीवरही जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुतीचे उमेदवार मोठ्या प्रमाणात विजयी झाले. त्यामुळे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमधील निकालांतील हा विरोधाभास नेमका कोणत्या राजकीय समीकरणांचा परिणाम आहे, याची स्पष्ट उकल अद्याप झालेली नाही.

लोकसभा निवडणुकीनंतर पुन्हा एकदा अशोकराव चव्हाण आणि प्रतापराव चिखलीकर यांच्यातील राजकीय दुरावा वाढल्याचे चित्र दिसून आले. महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांमध्ये महायुतीतील घटक पक्षांनी अनेक ठिकाणी स्वतंत्र भूमिका घेतली. प्रचारादरम्यान दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर केलेले आरोप आणि टीका यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात अशोकराव चव्हाण यांनी “कोण प्रतापराव? मी त्यांना ओळखत नाही,” अशी टीका केली होती. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळावरही त्यांनी निशाणा साधला होता.

आता मात्र, “मी प्रतापराव चिखलीकर यांच्यावर टीका केली नव्हती… राष्ट्रवादीमध्ये प्रतापराव पाबळे सुद्धा आहेत,” असे स्पष्टीकरण अशोकराव चव्हाण यांनी कालच्या पत्रकार परिषदेत दिले. मात्र, विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय परिस्थिती बदलताना दिसत आहे. महायुतीचे उमेदवार अमरनाथ राजूरकर यांच्या विजयासाठी सर्व घटक पक्षांना एकत्र येण्याची गरज निर्माण झाल्यानंतर संवाद आणि समन्वयाचे महत्त्व अधोरेखित केले जात आहे.

मग खरा प्रश्न या निमित्ताने उभा राहतो की, लोकसभेच्या व नंतर झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये महायुतीच्या तीनही पक्षांत समन्वय का दिसला नाही, एकसंघपणा का दिसला नाही? राजकीय निरीक्षकांच्या मते, स्थानिक स्वराज्य संस्था, महानगरपालिका किंवा नगरपालिका निवडणुकांमध्ये कार्यकर्ते आणि स्थानिक नेते एकमेकांविरुद्ध संघर्ष करताना दिसतात; मात्र विधान परिषद, राज्यसभा किंवा इतर प्रतिष्ठेच्या निवडणुकांमध्ये पक्षीय आणि आघाडीधर्माचे महत्त्व अचानक वाढते. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात.

विधान परिषद निवडणुकीचा तिढा थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यानंतर प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी पक्षादेशाला सर्वोच्च प्राधान्य देत आपण फडणवीस यांचे कार्यकर्ते असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे भाजपचे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील मतदार महायुतीचे उमेदवार अमरनाथ राजूरकर यांच्या पाठीशी उभे राहतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

COMMENTS