भाजपच्या स्थापनेपासून पक्षासाठी अहोरात्र झटणार्या कार्यकर्त्यांना सन्मान आणि जबाबदारी देण्याची परंपरा स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे आणि स्वर्गीय प्र
भाजपच्या स्थापनेपासून पक्षासाठी अहोरात्र झटणार्या कार्यकर्त्यांना सन्मान आणि जबाबदारी देण्याची परंपरा स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे आणि स्वर्गीय प्रमोद महाजन यांनी रुजविली होती. 1995 मध्ये शिवसेना-भाजप युतीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर अवघ्या काही महिन्यांतच कार्यकर्त्यांच्या योगदानाची दखल घेत त्यांना विविध महामंडळे, समित्या आणि संस्थांमध्ये संधी देण्यात आली. त्यामुळे 1995 चा काळ हा भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांसाठी खर्या अर्थाने सुवर्णकाळ ठरल्याची भावना आजही नांदेड जिल्ह्यातील जुन्या कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे.
14 मार्च 1995 रोजी मनोहर जोशी यांनी मुख्यमंत्रीपदाची, तर स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांनी उपमुख्यमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर कार्यकर्त्यांना न्याय देण्याचा धडाका सुरू झाला. कोणतीही पूर्वकल्पना न देता 2 नोव्हेंबर 1995 रोजी विविध महामंडळे आणि समित्यांवर कार्यकर्त्यांच्या नियुक्त्यांची घोषणा करण्यात आली आणि त्यावेळी अनेकांना सुखद धक्का बसला होता. माजी आमदार चंद्रकांत मास्की यांची महाराष्ट्र राज्य लेखा समितीच्या अध्यक्षपदी, तर प्रा. गणपत राऊत यांची मराठवाडा वस्त्रोद्योग महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. याशिवाय बाळासाहेब पांडे, संजीवनीताई साकळकर यांना वस्त्रोद्योग महामंडळाच्या संचालकपदी, सुनील नेरलकर आणि प्रशांत पांडे यांना एसटी महामंडळावर, प्रा. नंदकुमार कुलकर्णी यांना म्हाडावर, मदन देशपांडे यांना बॉयलर महामंडळावर, संभाजी पवार यांना सिडकोवर, तर प्राचार्य अरविंद एकताटे यांना महाराष्ट्र राज्य ग्रंथालयाच्या संचालकपदी संधी देण्यात आली होती. त्याचबरोबर स्थानिक समित्या आणि तालुकास्तरावरील कार्यकारी दंडाधिकारी या मानद पदांवर राज्यभरातील सुमारे 475 कार्यकर्त्यांना संधी मिळाली होती. जिल्हाध्यक्ष प्रा. गणपत राऊत यांनीही अनेकदा निष्ठावंत कार्यकर्त्यांना न्याय मिळावा, अशी भूमिका मांडली आहे. त्यांचे म्हणणे आहे की, स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांनी कार्यकर्त्यांच्या कामाची दखल घेत त्यांना सन्मानाची पदे दिली. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये पक्षाप्रती आत्मीयता आणि बांधिलकी वाढली होती. मात्र, सध्याच्या काळात परिस्थिती बदलल्याची खंत जुन्या कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे. विविध महामंडळे, समित्या आणि संस्थांवर नियुक्त्यांमध्ये तळागाळातील कार्यकर्त्यांना संधी मिळत नसल्याने कार्यकर्ता वर्ग नाराज असल्याचे बोलले जात आहे. पक्षासाठी आयुष्य घालवलेल्या कार्यकर्त्यांचा विचार कोण करणार? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. नांदेडमधील अनेक ज्येष्ठ भाजप कार्यकर्त्यांच्या मते, 1996 मध्ये कार्यकर्त्यांचा सन्मान करणारी नेतृत्वशैली होती. त्यामुळे आजही स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांची आठवण काढताना तो काळच वेगळा होता अशी भावना व्यक्त होत आहे. कार्यकर्त्यांना सन्मान, संधी आणि जबाबदारी देणारी परंपरा पुन्हा सुरू व्हावी, अशी अपेक्षा पक्षातील निष्ठावंत कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहे.

COMMENTS