किनवट : तालुक्यातील बोधडी (बु.) या बलाढ्य ग्रामपंचायतीत सध्या लोकशाहीचा गळा आवळला गेल्याचं संतापजनक चित्र समोर आलं असून, सामाजिक कार्यकर्ते गणेश

किनवट : तालुक्यातील बोधडी (बु.) या बलाढ्य ग्रामपंचायतीत सध्या लोकशाहीचा गळा आवळला गेल्याचं संतापजनक चित्र समोर आलं असून, सामाजिक कार्यकर्ते गणेश गवले यांनी सोशल मीडियावर या भ्रष्ट आणि बेफिकीर कारभाराचे वाभाडे काढले आहेत. गावातील जनता केवळ ’मुक प्रेक्षक’ बनून पाहत आहे, कारण त्यांना बोलायला आणि प्रश्न विचारायला व्यासपीठच उरू दिलेलं नाही.
स्वातंत्र्याचा अमृतकाळ साजरा करणार्या देशात बोधडीकरांचं बोलण्याचं स्वातंत्र्यच हिरावून घेतलं गेलंय. 2022 पासून आजतागायत गावात एकही ग्रामसभा झालेली नाही. कारभार्यांनी गावाला ’गृहीत’ धरून मनमानी कारभाराचा उच्छाद मांडला आहे. कागदावर दाखवला गेला आहे. पण प्रत्यक्षात शाळेत पाहिलं तर दुरवस्थेची लक्तरे टांगली गेली आहेत. मग हा निधी नेमका शाळेच्या भिंतीवर खर्च झाला की कारभार्यांच्या खिशात जिरला? हा थेट आणि खोचक सवाल आता उपस्थित होत आहे. ज्या शाळेने गावचं भवितव्य घडवायचं, ती शाळाच आज ’वाली’ नसल्यासारखी शेवटच्या घटका मोजत आहे. शाळा आणि गाव दोघांनाही कुणाचाच धनी उरलेला नाही. या भयानक अवस्था आणि दुरवस्थेला कंटाळून पालकांनी आपल्या मुलांचे प्रवेश काढायला सुरुवात केली असून, पटसंख्या वेगाने घटत आहे.
येत्या 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून ग्रामसेवकाने तातडीने ग्रामसभा आयोजित करावी, अशी ठाम मागणी आता गावकर्यांनी लावून धरली आहे. ग्रामसेवक आणि सरपंच यांनी आतापर्यंत दडपून ठेवलेला कारभार आणि शिक्षणाच्या नावाखाली झालेला पैशांचा हिशोब गावकर्यांसमोर मांडावाच लागेल. गावाला वाली उरला नाही, शाळा भकास झालीये अन् कारभारी मजेत आहेत! पण आता बोधडीकर गप्प बसणार नाहीत. 15 ऑगस्टला ग्रामसेवक आणि सरपंचाला सन 2022 पासून ग्रामसभा न घेणार्या ग्रामसेवकावर कारवाई का झाली नाही? 15 व्या वित्त आयोगाचा निधी खर्च दाखवूनही शाळेची अवस्था दयनीय का? मुलांच्या भविष्याशी खेळणार्या या बेफिकीर कारभार्यांना कुणाचे छत्रछाया आहे? या सगळ्या भ्रष्ट कारभाराचा जाब विचारावाच लागेल, असा रोखठोक सवाल गणेश गवले यांनी विचारला आहे. आता येत्या 15 ऑगस्टला प्रशासन गावकर्यांच्या प्रश्नांना उत्तरे देऊन हिशोब देणार, की पुन्हा एकदा पळवाट काढून गावाला अंधारात ठेवणार, याकडे संपूर्ण किनवट तालुक्याचे लक्ष लागले आहे.

COMMENTS