श्रीरामपूर: परिवहन मंत्र्यांनी प्रथम पुरेशा प्रमाणात वाहक, चालक आणि नवीन बसेसची पूर्तता करावी आणि त्यानंतरच उत्पन्न न वाढवणाऱ्या अधिकाऱ्यांवर कार

श्रीरामपूर: परिवहन मंत्र्यांनी प्रथम पुरेशा प्रमाणात वाहक, चालक आणि नवीन बसेसची पूर्तता करावी आणि त्यानंतरच उत्पन्न न वाढवणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, असे रोखठोक मत प्रवासी संघटनेचे अध्यक्ष रणजित श्रीगोड यांनी व्यक्त केले. श्रीरामपूर बस डेपोच्या कार्यशाळेत सलग २७ वर्षे सेवा देणारे जगन्नाथ लांडे यांच्या सेवानिवृत्ती सत्कार समारंभात ते बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डेपो व्यवस्थापक अनिल बेहरे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रवासी संघटनेचे अध्यक्ष रणजित श्रीगोड उपस्थित होते.
या सेवानिवृत्ती सोहळ्यात बोलताना रणजित श्रीगोड म्हणाले की, “आज एसटीचे प्रवासी मोठ्या संख्येने वाढले आहेत. मात्र, मागणीप्रमाणे बसेस उपलब्ध होत नाहीत. वाहक-चालक आणि बसेसची अपुरी संख्या यामुळे प्रवासी सेवा वाढविण्यात अनेक अडचणी येत आहेत आणि त्याचा थेट परिणाम एसटीच्या आर्थिक उत्पन्नावर होत आहे. एस. टी. देखभाल करिता निधी अल्प मिळतो त्याचा परिणाम बसेस रस्त्यात बंद पडतात.दुसरीकडे परिवहन मंत्री कडक कारवाईचा इशारा देत आहेत, हे धोरण विसंगत आहे,” असा सवाल त्यांनी प्रशासनाला उद्देशून केला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत कामगार संघटनेचे डेपो अध्यक्ष अमोल पटारे यांनी केले. यावेळी सेवानिवृत्त कर्मचारी देविदास कहाने, बाळासाहेब ढोकणे आणि प्रवीण आलवणे यांचीही भाषणे झाली. डेपो व्यवस्थापक अनिल बेहरे यांनी आपल्या मनोगतात जगन्नाथ लांडे यांनी आजवर केलेल्या प्रामाणिक कामाचा विशेष गौरव केला व त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी वर्कशॉप प्रमुख सौ. सोनाली संगमकर, ‘प्रवासी मित्र’ प्रीतम बोरावके, विष्णुपंत गर्जे, वाहतूक नियंत्रक खेमनर, शशीकांत लांडे, यांच्यासह अनेक सेवानिवृत्त कर्मचारी, डेपोचे वाहक-चालक आणि वर्कशॉपचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS