तमिळनाडूच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी उलथापालथ घडताना दिसत आहे. चित्रपटसृष्टीतून राजकारणात आलेले अभिनेता विजय आणि त्यांचा पक्ष टीव्हीके यांनी व

तमिळनाडूच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी उलथापालथ घडताना दिसत आहे. चित्रपटसृष्टीतून राजकारणात आलेले अभिनेता विजय आणि त्यांचा पक्ष टीव्हीके यांनी विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा मिळवत पारंपरिक राजकीय समीकरणांना मोठे आव्हान दिले आहे. मात्र, सत्ता स्थापनेचा मार्ग अजूनही स्पष्ट झालेला नाही. थलापती विजय यांच्या टीव्हीके या पक्षाने 108 जागा मिळवल्या असल्या तरी, त्यांना बहुमताचा दावा करण्यासाठी आणखी 10 आमदारांची गरज भासते, अशातच काँगे्रसने डीएमकेसोबतची आघाडी तोडत विजय यांना पाठिंबा दिल्यामुळे त्यांच्याकडे 113 आमदार झाले असले तरी, आणखी 5 आमदारांची संख्या कमी पडत आहे. यातच विजय सलग दुसर्या दिवशी राज्यपालांची भेट घेत आहेत, बहुमत सिद्ध करण्यासाठी धडपड सुरू आहे आणि दुसरीकडे द्रमुक व अण्णाद्रमुक यांच्यातील पडद्यामागील चर्चांनी राजकीय वातावरण आणखी गडद केले आहे. या घडामोडी केवळ सरकार स्थापनेपुरत्या मर्यादित नाहीत; त्या तमिळनाडूच्या भविष्यातील राजकीय संस्कृतीची दिशा ठरवू शकतात.
तमिळनाडूची राजकीय परंपरा ही नेहमीच व्यक्तिमत्त्वकेंद्री राहिली आहे. द्रविड चळवळीपासून सुरू झालेल्या या प्रवासात करुणानिधी, एम.जी. रामचंद्रन, जयललिता यांसारख्या करिष्माई नेत्यांनी जनमानसावर अधिराज्य गाजवले. चित्रपट आणि राजकारण यांचे नाते येथे नवीन नाही. लोकभावनांवर प्रभाव टाकणारा कलाकार हा थेट सत्तेच्या शर्यतीत उतरतो आणि जनतेचा पाठिंबा मिळवतो, ही तमिळनाडूची वैशिष्ट्यपूर्ण राजकीय परंपरा राहिली आहे. विजय यांच्या उदयाने या परंपरेला आधुनिक स्वरूप मिळाले आहे. टीव्हीकेला मिळालेल्या जागा हे केवळ निवडणुकीतील यश नाही, तर जनतेच्या असंतोषाचे प्रतीक आहे. अनेक वर्षे द्रमुक आणि अण्णाद्रमुक या दोन पक्षांभोवती फिरणार्या राजकारणाला मतदारांनी पर्याय शोधण्यास सुरुवात केली आहे. बेरोजगारी, भ्रष्टाचार, घराणेशाही आणि सत्ताधार्यांवरील वाढता अविश्वास या पार्श्वभूमीवर विजय यांनी स्वतःला नव्या पिढीचा पर्याय म्हणून उभे केले. त्यांच्या सभांना मिळालेली गर्दी आणि तरुणांमधील लोकप्रियता यामुळेच टीव्हीकेला अपेक्षेपेक्षा मोठे यश मिळाले. परंतु निवडणूक जिंकणे आणि सरकार चालवणे यात मोठा फरक असतो. टीव्हीकेकडे 108 जागा आहेत, तर बहुमतासाठी 118 सदस्यांची आवश्यकता आहे. काँग्रेसच्या पाच आमदारांचा पाठिंबा मिळाला असला, तरी अजूनही आवश्यक संख्या अपुरी आहे. अशा परिस्थितीत विजय यांची राज्यपालांकडे धाव ही केवळ औपचारिकता नसून सत्तेच्या निर्णायक संघर्षाचा भाग आहे. राज्यपालांनी स्पष्ट बहुमताची मागणी करणे हे घटनात्मकदृष्ट्या योग्य असले, तरी त्यातून राजकीय तणाव अधिक वाढला आहे. या संपूर्ण घडामोडीत सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे द्रमुक आणि अण्णाद्रमुक यांच्यात सुरू असल्याचे सांगितले जाणारे चर्चासत्र. तमिळनाडूच्या राजकारणात हे दोन्ही पक्ष कट्टर प्रतिस्पर्धी मानले जातात. अनेक दशकांपासून त्यांनी एकमेकांविरोधात तीव्र संघर्ष केला आहे. अशा दोन पक्षांनी एकत्र येण्याचा विचार करणे, हीच राज्यातील बदलत्या परिस्थितीची मोठी खूण आहे. विजय यांच्या वाढत्या प्रभावामुळे पारंपरिक पक्षांना स्वतःचे अस्तित्व धोक्यात आल्याची जाणीव झाली आहे.जर अण्णाद्रमुकने सरकार स्थापन करून द्रमुकने बाहेरून पाठिंबा दिला, तर ते केवळ सत्तेसाठीचे गणित ठरेल. विचारधारा, जनादेश आणि लोकभावना यांना दुय्यम स्थान देणारी ही भूमिका ठरू शकते. निवडणुकीत मतदारांनी ज्यांच्याविरोधात मतदान केले, तेच पक्ष नंतर सत्तेसाठी हातमिळवणी करत असतील, तर लोकशाहीतील नैतिकतेवर प्रश्न उपस्थित होतात. भारतीय राजकारणात अशा संधीसाधू आघाड्या नवीन नाहीत; मात्र तमिळनाडूत त्याचा परिणाम अधिक व्यापक असू शकतो. याउलट, विजय यांच्यासमोरही मोठी कसोटी आहे. लोकप्रियता आणि जनसमर्थन याच्या बळावर निवडणूक जिंकता येते; पण प्रशासन चालवण्यासाठी राजकीय परिपक्वता, अनुभव आणि स्थिर नेतृत्व आवश्यक असते. टीव्हीके हा तुलनेने नवा पक्ष आहे. त्यांच्याकडे अनुभवी प्रशासनिक संघटनात्मक यंत्रणा अद्याप पूर्णपणे तयार नाही. त्यामुळे सत्तेत आल्यास त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. परंतु हेही तितकेच खरे की, नव्या नेतृत्वाला संधी नाकारली गेल्यास लोकांमध्ये प्रस्थापित व्यवस्थेविरोधातील असंतोष अधिक तीव्र होऊ शकतो. या घडामोडींमध्ये राज्यपालांची भूमिकाही चर्चेचा विषय बनली आहे. अनेक राज्यांत सरकार स्थापनेच्या प्रक्रियेत राज्यपालांवर पक्षपातीपणाचे आरोप झाले आहेत. त्यामुळे तमिळनाडूत घेतला जाणारा प्रत्येक निर्णय राष्ट्रीय पातळीवर बारकाईने पाहिला जात आहे. सर्वात मोठा पक्ष म्हणून टीव्हीकेला संधी द्यावी का, की स्थिर बहुमत सिद्ध करणार्या इतर आघाडीला प्राधान्य द्यावे, हा घटनात्मक आणि राजकीय दोन्ही पातळ्यांवर महत्त्वाचा प्रश्न आहे. या संपूर्ण संघर्षात मतदारांची भूमिका सर्वाधिक महत्त्वाची आहे. तमिळनाडूतील जनतेने स्पष्टपणे बदलाची इच्छा व्यक्त केली आहे. पारंपरिक पक्षांना धक्का देत त्यांनी नव्या नेतृत्वाला संधी दिली. आता जर पडद्यामागील राजकीय व्यवहारांमुळे जनादेशाला वेगळे वळण मिळाले, तर लोकशाहीवरील विश्वास कमी होण्याची भीती आहे. राजकारण केवळ सत्तेचे अंकगणित नसते; ते लोकांच्या अपेक्षांचे आणि विश्वासाचे प्रतिनिधित्व असते. तमिळनाडूच्या राजकारणातील ही परिस्थिती देशासाठीही महत्त्वाची आहे. आज अनेक राज्यांत प्रादेशिक पक्षांचे वर्चस्व वाढत आहे आणि व्यक्तिमत्त्वकेंद्री राजकारण अधिक प्रभावी बनत आहे. विजय यांचा उदय हा त्या व्यापक बदलाचा भाग आहे. चित्रपटसृष्टीतील लोकप्रियता, सामाजिक माध्यमांचा प्रभाव आणि तरुण मतदारांची मानसिकता यामुळे राजकीय समीकरणे वेगाने बदलत आहेत. पारंपरिक पक्षांना आता केवळ जुन्या वारशावर निवडणुका जिंकणे कठीण होत चालले आहे.
शेवटी प्रश्न असा आहे की, तमिळनाडूला स्थिर आणि लोकाभिमुख सरकार मिळणार का? विजय यांना आवश्यक पाठिंबा मिळून त्यांचे सरकार स्थापन होईल, की द्रमुक-अण्णाद्रमुकसारखे जुने प्रतिस्पर्धी एकत्र येऊन सत्तेची नवी समीकरणे तयार करतील? याचे उत्तर पुढील काही दिवसांत स्पष्ट होईल. मात्र, या संघर्षाने एक गोष्ट निश्चित केली आहे – तमिळनाडूचे राजकारण नव्या पर्वात प्रवेश करत आहे.
या नव्या पर्वात जनतेचा विश्वास जपणारे, जनादेशाचा सन्मान करणारे आणि सत्तेपेक्षा राज्यहिताला प्राधान्य देणारे नेतृत्व पुढे आले, तर तमिळनाडूची लोकशाही अधिक मजबूत होईल. अन्यथा सत्तेच्या राजकारणात मतदारांचा आवाज पुन्हा एकदा हरवण्याचा धोका कायम राहील.

COMMENTS