संगमनेर : सतत काम करून दुष्काळी भागाला वरदान ठरणारे निळवंडे धरण व कालवे, संगमनेर शहरासाठी थेट पाईपलाईन योजना,तालुका शेजारी विमानतळ, नियोजित नाशिक

संगमनेर : सतत काम करून दुष्काळी भागाला वरदान ठरणारे निळवंडे धरण व कालवे, संगमनेर शहरासाठी थेट पाईपलाईन योजना,तालुका शेजारी विमानतळ, नियोजित नाशिक पुणे रेल्वे, यांसह राज्यातील सर्वोत्कृष्ट सहकारी संस्था, शिक्षण संस्था आणि शांतता सुव्यवस्था असलेला सज्जन व विकसित तालुका ही संगमनेर तालुक्याची ओळख निर्माण केली आहे. निळवंडे धरण व दोन्ही कालवे पूर्ण करून दुष्काळी भागातील प्रत्येक शेतकऱ्याला पाणी देणे हे जीवनाचे उद्दिष्ट असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.
संगमनेर तालुका युवक काँग्रेस व एनएसयुआयच्या वतीने आयोजित युवा संगम या कार्यक्रमात युवक काँग्रेसच्या युवकांनी घेतलेल्या प्रकट मुलाखतीत त्यांनी अत्यंत मनमोकळेपणाने उत्तरे दिली.
यावेळी आपल्या महाविद्यालयीन कार्यकाळाबाबत माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की विद्यार्थी दशेमध्ये विविध आंदोलनांमध्ये सहभागी घेतला याचबरोबर विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने पुढाकार राहिला. पुण्यात लॉ कॉलेजचे जनरल सेक्रेटरी पद भूषविले. यामधून मोठा मित्रपरिवार निर्माण झाला.
निळवंडे धरण पूर्ण करणे हे जीवनाचे ध्येय होते.1992 ला निळवंडे धरणाचे काम सुरू झाले. 1999 नंतर कॅबिनेट मंत्रीपद मिळत असताना सुद्धा निळवंडे कामासाठी राज्यमंत्रीपद मागून घेतले. अनंत अडचणीवर मात करून निळवंडे धरण पूर्ण केले. 2012 मध्ये भिंत पूर्ण झाली. डावा व उजवा कालव्यांची कामे पूर्ण केली. सर्व शेतकऱ्यांना पाणी देणे हे आपल्या जीवनाचे उद्दिष्ट आहे. काम पूर्ण आपण केले. मात्र पाणी वाटपासाठी आपण नाही. सध्या राजकारणामध्ये जातीयता आणि रंगद्वेष वाढला असून आपण वारकरी संप्रदाय व राज्यघटना मानणाऱ्या विचाराचे आहोत. राजकारण हे जनतेच्या विकासासाठी करायचे असते. असे सांगताना सत्ताधाऱ्यांनी राजधर्माचे पालन केले पाहिजे मात्र सध्या ते होत नसल्याची टीका त्यांनी केली.
ईडीच्या भीतीपोटी पक्ष बदलले
आपल्या कुटुंबाला वारकरी व पुरोगामी विचारांची बैठक आहे. राजकारण हे गोरगरिबांच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी असते. सत्तेसाठी नाही. मात्र काही जण विकासाचे नाव सांगून स्वार्थासाठी किंवा ईडीच्या भीतीपोटी पक्ष बदलून गेले आहेत. इतिहास सर्व गोष्टींची नोंद घेतो. आपली लढाई ही विचारांसाठी आणि तत्त्वांसाठी आहे . येणाऱ्या काळात सर्व बदलणार आहे. लवकरच ती ताकदीची वेळ येईल असे सांगताना इतिहास नेहमी लढणाऱ्यांची नोंद घेतो असे काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.

COMMENTS