बीड : येथील श्री बंकटस्वामी महाविद्यालयात सेविका सौ. शिवगंगा सोनेकर यांच्या सेवानिवृत्ती निमित्त सेवा गौरव सोहळ्याचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आल
बीड : येथील श्री बंकटस्वामी महाविद्यालयात सेविका सौ. शिवगंगा सोनेकर यांच्या सेवानिवृत्ती निमित्त सेवा गौरव सोहळ्याचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शंकर धांडे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून श्री बंकटस्वामी शिक्षण संस्थेच्या सचिव सौ.सरोज गोपाळराव सोंडगे उपस्थित होत्या.
कार्यक्रमास उपप्राचार्य डॉ.शिवाजी मोरे तसेच कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. ब्रह्मनाथ मेंगडे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी सौ. शिवगंगा सोनेकर व त्यांच्या यजमानांचा महाविद्यालयाच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला. या प्रसंगी विविध मान्यवरांनी आपल्या मनोगतातून सोनेकर मावशींच्या कार्याचा गौरव केला. त्यांनी आपल्या सेवाकाळात कोणतेही काम कमी समजले नाही, काम हेच दैवत मानून प्रामाणिकपणे कार्य केले. आदर्श आई, पत्नी, गृहिणी आणि कर्मचारी या सर्व भूमिका त्यांनी उत्कृष्टरीत्या पार पाडल्या. त्यामुळेच त्यांना महाविद्यालयातील कर्मयोगी म्हणून ओळखले जाते, असे मत अनेक वक्त्यांनी व्यक्त केले. मनोगत व्यक्त करताना अनेकजण भावनिक झाले. डॉ.शिवाजी मोरे, प्रा. ब्रह्मनाथ मेंगडे, डॉ.जगन्नाथ चव्हाण, डॉ.सुनील त्रिभुवन, श्री संभाजी गायकवाड यांनी गीतांद्वारे भावना व्यक्त केल्या. तसेच डॉ.प्रकाश कोंका, प्रा.एच.एन.सोट, प्रा.वर्षा भोसले, प्रा.हंगे सर, डॉ.जयद्रत मगर, डॉ.राजीव काळे, डॉ.बावणे मॅडम यांनीही आपल्या भावना मांडल्या. प्रमुख अतिथी सौ. सरोज गोपाळराव सोंडगे यांनी मनोगतात सांगितले की, साध्या कुटुंबातून आलेल्या सोनेकर मावशींनी महाविद्यालयात कामालाच दैवत मानून एक आदर्श निर्माण केला. त्यांनी कधीही अहंकार बाळगला नाही. आज अशा कर्तव्यनिष्ठ कर्मचार्यांची उणीव जाणवेल, असे सांगत त्यांनी त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी व पुढील आयुष्यात तीर्थयात्रा व पर्यटनासाठी शुभेच्छा दिल्या. अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. शंकर धांडे यांनी सांगितले की, सोनेकर मावशींनी कधीही कोणत्याही कामाला नकार दिला नाही. त्यांच्या सेवानिवृत्तीमुळे महाविद्यालय एक आदर्श व्यक्तिमत्व गमावत आहे. सेवानिवृत्ती हा आनंद आणि दुःखाचा संगम असतो, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. या कार्यक्रमास सोनेकर कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्री अशोक भांगरे, अमोल भांगरे, अश्विनी भांगरे, सरला भांगरे तसेच कुटुंबातील इतर सदस्यांनी मनोगत व्यक्त करून कृतज्ञता व्यक्त केली. शुभम कानडे, साक्षी कानडे व अमोल भांगरे यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. सर्वात शेवटी सत्कारमूर्ती शिवगंगा सोनेकर यांनी या सत्कार समारंभ प्रसंगी श्री बंकटस्वामी शिक्षण संस्थेचे व प्रशासनाचे ऋण व्यक्त केले. या ठिकाणी मला सेवेची संधी दिली त्यामुळे आज मला होणारा आनंद हा खूप मोठा आहे. कारण या संस्थेने मला संधी दिली आणि मी फक्त माझे कर्तव्य प्रामाणिकपणे केले,अशा भावना त्यांनी याप्रसंगी व्यक्त केल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. छाया सोंडगे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा.रणजीत आखाडे यांनी मानले. कार्यक्रमास महाविद्यालयातील शिक्षक, प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS