पुणे : सोलापूर व पंढरपूर परिसरातील दोन प्रमुख साखर कारखान्यांकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांची तब्बल १५० कोटी रुपयांहून अधिक एफआरपी थकवून आर्थिक फसवणूक

पुणे : सोलापूर व पंढरपूर परिसरातील दोन प्रमुख साखर कारखान्यांकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांची तब्बल १५० कोटी रुपयांहून अधिक एफआरपी थकवून आर्थिक फसवणूक केल्याचा गंभीर आरोप शेतकरी संघटनांकडून करण्यात आला आहे. या प्रकरणी तात्काळ गुन्हे दाखल करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
शरद जोशी विचारमंच शेतकरी कामगार एम.एस. फाऊंडेशन व शेतकरी संघटना महासंघ (महाराष्ट्र राज्य) यांच्या वतीने मुख्यमंत्री, गृहमंत्री, सहकार मंत्री, ऊस आयुक्त (पुणे), प्रादेशिक सहसंचालक (साखर) सोलापूर विभाग, सहकार आयुक्त, जिल्हाधिकारी सोलापूर व पुणे तसेच विभागीय आयुक्त पुणे यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.
तक्रारीनुसार, पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील चंद्रभागा सहकारी साखर कारखाना व दक्षिण सोलापूरमधील धोत्री येथील गोकुळ शुगर इंडस्ट्रीज यांच्याकडून शेतकऱ्यांची एफआरपी थकवण्यात आली आहे. तसेच परवानगीशिवाय मोठ्या प्रमाणावर ऊस गाळप, शासनाला दिशाभूल करणारे अहवाल सादर करणे, दंड थकवणे, वजन व रिकव्हरीमध्ये अनियमितता आदी गंभीर आरोपही करण्यात आले आहेत.
या प्रकरणात कारखान्यांचे पदाधिकारी व संबंधित व्यक्तींवर फसवणूक, विश्वासघात, संगनमत व बनावट कागदपत्रे तयार करण्यासारख्या गंभीर गुन्ह्यांतर्गत कारवाई करावी, अशी मागणी संघटनांनी केली आहे. तसेच संबंधित कारखान्यांची संपत्ती जप्त करून शेतकऱ्यांची थकबाकी वसूल करावी व कारखान्यांचे परवाने रद्द करावेत, अशीही मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, या प्रकरणात तात्काळ कारवाई न झाल्यास राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. अन्नधान्य व भाजीपाला पुरवठा बंद करण्यासह सत्याग्रह व न्यायालयीन लढा उभारला जाईल, असेही संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
शरद जोशी विचारमंचाचे राष्ट्रीय अध्यक्ष विठ्ठल राजे पवार यांनी, “शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशावर डाका टाकणाऱ्यांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे. सरकारने तात्काळ गुन्हे दाखल करावेत, अन्यथा तीव्र आंदोलन उभारले जाईल,” असा इशारा दिला आहे.

COMMENTS