Homeताज्या बातम्या

नीटमध्ये देशात 172 वी रँक मिळवत वडवणीच्या कृष्णा जाधवचा सुवर्ण पराक्रम!686 गुणांची दमदार कामगिरी; राजर्षी शाहू विद्यालयाकडून गौरव

वडवणी तालुक्यातील साळींबा या छोट्याशा गावचा रहिवासी व वडवणी येथील छत्रपती राजर्षी शाहू महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी चि.

धुनकवाड-2 ची सुपुत्री अंजली विश्वनाथ भोसले हिचे घवघवीत यश
हर्मिका जगतकर हिचे बारावी विज्ञान शाखेत घवघवीत यश
नांदेड उत्तरमध्ये दर्जेदार शिक्षणासाठी डिजिटल शाळांचा संकल्प; रंगभरण स्पर्धेला 3,500 विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसादसंध्याताई फाऊंडेशनच्या उपक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचा व मुख्याध्यापकांचा गौरव



वडवणी तालुक्यातील साळींबा या छोट्याशा गावचा रहिवासी व वडवणी येथील छत्रपती राजर्षी शाहू महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी चि.कृष्णा भागवत जाधव याने वैद्यकीय राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परिक्षा नीट-2026 मध्ये 686 गुण मिळवत देशातून 172 वी रँक पटकावून अभूतपूर्व यश संपादन केले आहे. व आपल्या आई-वडिलांचे, गावाचे व विद्यालयाचे नाव रोशन केले आहे. आपल्या जिद्द, चिकाटी आणि सातत्यपूर्ण परिश्रमाच्या जोरावर मिळवलेल्या या यशामुळे विद्यालयासह वडवणी तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्राच्या शिरपेचात याने मानाचा तुरा रोवला गेला आहे.
या दैदिप्यमान यशाबध्दल विद्यालयाच्या वतीने काल दि.17 शुक्रवार रोजी कृष्णा जाधव याचा तसेच पालक भागवतराव जाधव शाल, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देवून गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष प्रा.सर्जेराव काळे सर होते. तर कार्यक्रमास विद्यालयाचे प्राचार्य सानप सर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच विठ्ठल सवासे, प्रा. वांगी सर, माजी सरपंच रामेश्वर भाऊ जाधव, विश्वनाथ शिंदे, प्रा.ओमप्रकाश जाधव सर यांच्यासह विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना संस्थेचे अध्यक्ष प्रा.सर्जेराव काळे सर म्हणाले की, कृष्णा जाधवने मिळवलेले यश हे केवळ त्याच्या कुटुंबासाठी किंवा विद्यालयासाठीच नव्हे, तर संपूर्ण वडवणी तालुक्यासाठी अभिमानाची बाब आहे. सातत्यपूर्ण परिश्रम, शिस्त, जिद्द आणि ध्येयाप्रती असलेली निष्ठा यामुळेच हे दैदिप्यमान यश त्याने संपादन केले आहे. आजच्या विद्यार्थ्यांनी कृष्णाच्या यशातून प्रेरणा घेवून मोठी स्वप्ने पाहावीत आणि ती पूर्ण करण्यासाठी अथक परिश्रम घ्यावेत. कृष्णा हा केवळ डॉक्टर बनून तिथपर्यंतच सीमित राहणारा विद्यार्थी नाही. त्याच्यात नेतृत्वगुण, अभ्यासू वृत्ती, व्यापक दृष्टीकोन आणि समाजासाठी काहीतरी मोठे करण्याची जिद्द आहे. त्यामुळे भविष्यात तो वैद्यकीय क्षेत्रात यश मिळवतानाच देशाच्या सर्वोच्च प्रशासकीय सेवेत प्रवेश करुन एक सक्षम, कर्तव्यदक्ष आणि लोकाभिमुख आयएएस किंवा सुपर क्लास वन अधिकारी म्हणून देशाची सेवा करतांना आपण निश्चितपणे पाहू, असा मला ठाम विश्वास आहे. ज्ञान, सेवा आणि संवेदनशीलता या त्रिसूत्रीच्या बळावर कृष्णाने समाजातील वंचित, गरजू आणि दुर्बल घटकांसाठी कार्य करावे, आपल्या विद्यालयाचे, आई-वडिलांचे आणि संपूर्ण महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल करावे, अशा मनःपूर्वक शुभेच्छा देत त्याच्या उज्ज्वल भवितव्यासाठी मी सदिच्छा व्यक्त करतो असेही काळे सर म्हणाले. या सत्काराला उत्तर देतांना कृष्णा जाधव म्हणाला की, यश हे नशिबावर नव्हे तर कष्टावर अवलंबून असते. नियमित अभ्यास, वेळेचे नियोजन, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचा विश्वास यामुळेच मला हे यश मिळाले. प्रत्येक विद्यार्थ्याने स्वतःवर विश्वास ठेवून प्रामाणिक प्रयत्न केले, तर यश निश्चित मिळते असेही शेवटी कृष्णा जाधव म्हणाले. यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांनी कृष्णा जाधव याच्या उज्ज्वल भवितव्यास शुभेच्छा देत त्याच्या यशाचा गौरव केला. विद्यालयातील विद्यार्थ्यांनीही त्याच्याकडून प्रेरणा घेवून स्पर्धा परिक्षांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करावे, असे आवाहन करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.जाधव सर यांनी केले तर सुत्रसंचालन महानवर सर यांनी केले. शेवटी उपस्थितांचे आभार इतापुरे सर यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्व शिक्षक, प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले. दरम्यान नीट परीक्षेतील या उल्लेखनीय यशामुळे कृष्णा जाधव यांच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या यशाने संपूर्ण वडवणी तालुक्याला अभिमानास्पद क्षण अनुभवायला मिळाला आहे.

COMMENTS