Homeताज्या बातम्यासंपादकीय

दुबार पेरणीचे संकट

शेतकरी हा नेहमीच नागवला जातोय, याचा प्रत्यय पुन्हा एकदा दिसून येत आहे. राज्यात उशीरा सुरू झालेला मान्सून, त्यानंतर शेतकर्‍यांनी केलेल्या पेरण्या,

भारताचा वाढता प्रभाव
आंदोलन बंदी ही तर, मुस्कटदाबी
कर्जबुडवे आणि हिंडेनबर्ग अहवाल

शेतकरी हा नेहमीच नागवला जातोय, याचा प्रत्यय पुन्हा एकदा दिसून येत आहे. राज्यात उशीरा सुरू झालेला मान्सून, त्यानंतर शेतकर्‍यांनी केलेल्या पेरण्या, त्यातच अनेक ठिकाणी निघालेले बोगस बियाणे, यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यातच मुसळधार पावसामुळे निर्माण झालेली पूरस्थिती, त्यामुळे बियाणे सडले असून, अनेक ठिकांणी पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. राज्यातील बळीराजा सध्या दुहेरी संकटात सापडला आहे. दुहेरी संकट म्हणण्याचे महत्वाचे कारण म्हणजे, एकतर जुलै महिना संपत आला आहे, तरी पेरण्या झालेल्या नाही. अनेक ठिकाणी यापूर्वीच पेरण्या झालेल्या आहेत, तर त्यांचे पीक सततच्या पावसामुळे धोक्यात आले आहे. त्यामुळे बळीराजा सध्या हवालदिल झाला आहे. विदर्भ, मराठवाडा पश्‍चिम महाराष्ट्रातील काही जिल्हे जलमय झाले आहे, तर अनेक ठिकाणी ढगफुटी झाल्यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकर्‍यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. पावसाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर सुरुवातीपासूनच तालुक्यातील बहुतांश शेतकर्‍यांनी खरीप हंगामाची पेरणी केली आहे; मात्र काही दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीने शेतकर्‍यांचे गणित बिघडले आहे. या अतिवृष्टीमुळे शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. त्यामुळे शेतकर्‍यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवल्याने अनेक शेतकर्‍यांनी चिंता व्यक्त केली. कोकण, मराठवाडा आणि पश्‍चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झालेली आहे. अनेक जिल्हे जलमय झाले आहे. त्यामुळे शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. बियाणे वाया गेले आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना पुन्हा एकदा दुबार पेरणीसाठी बियाणे खरेदी करावी लागणार आहे, त्यासाठी शेतकर्‍यांची आर्थिक परवड मोठ्या प्रमाणात होणार आहे. तर दुसरीकडे बोगस बियाण्यांच्या घटनांमुळे शेतकर्‍यांना मानसिक धक्का बसतांना दिसून येत आहे. मराठवाड्यातील लातूर, बीड, उस्मानाबादसह औरंगाबादच्या शेतकर्‍यांवर बोगस बियाणांमुळे दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे. तर बियाणे न उगवल्याच्या तक्रारी कृषी विभागाकडे करण्यात येत असून, त्यानुसार पंचनामे देखील करण्यास सुरुवात झाली आहे. ज्यात औरंगाबादच्या सोयगाव तालुक्यातील पुरवठा झालेल्या खतांचे नऊ नमुने अप्रमाणित असल्याचा अहवाल प्रयोगशाळेकडून प्राप्त झाला आहे. लातूर जिल्ह्यात बियाणे न उगवल्याच्या 220 शेतकर्‍यांनी तक्रारी दाखल झाल्या आहेत, बीडच्या अंबाजोगाईतील 60 तक्रारी दाखल झाल्या आहेत, तर उस्मानाबाद जिल्ह्यात देखील 36 तक्रारी कृषी विभागाकडे दाखल झाल्या आहेत. त्यामुळे बोगस बियाण्यांमुळे शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, त्याची भरपाई शेतकर्‍यांना मिळण्याची शक्यता तशी कमीच आहे. त्यातच निसर्गाचा प्रकोप सुरू असल्यामुळे अनेक शेतकर्‍यांची शेतीच वाहून गेल्याचे प्रकार समोर आले आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी झालेली ढगफुटी, अतिवृष्टीमुळे शेतकर्‍यांच्या नुकसान झाले आहे, अनेक ठिकाणी प्रशासनाकडून पंचनामे करण्यात येत आहे. विधिमंडळात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पूरग्रस्तांसाठी 10 हजार रुपयांच्या तातडीच्या मदतीची घोषणा केली आहे. यात पुरामुळे दुकानांचे नुकसान झाल्यास 50 हजार रुपयांची मदत केली जाईल. तसेच पुरात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 4 लाख रुपयांची नुकसान भरपाई दिली जाईल. 19 जुलै रोजी राज्याच्या विविध जिल्ह्यांत अतिवृष्टी झाली. यवतमाळ, बुलडाणा, वाशिम या जिल्ह्यांमध्ये प्रचंड पाऊस पडला. मात्र ही मदत तोकडी असून, शेतकरी मात्र दरवर्षी मानवी असो वा कृत्रिम असो वा नैसर्गिक प्रकोपाने नागवला जात आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना स्वयंपूर्ण करण्याची खरी गरज आहे. शेतकर्‍यांनी शेतीसोबतच जोडधंदे जोपासण्याची गरज आहे, मात्र मराठवाडा आणि विदर्भात पुरेश्या सुविधाअभावी शेतकर्‍यांना जोडधंदे करता येत नाही, परिणामी या शेतकर्‍यांना शेतीवर अवलंबून राहावे लागते, मात्र अशा नैसर्गिक प्रकोप असो की, बोगस बियाणे असो, यामुळे शेतकरी मात्र रडकुंडीला येतो, त्यातून आत्महत्या वाढत चालल्या आहेत.

COMMENTS