वडवणी : धुनकवाड येथे सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या सहाव्या दिवशीची कीर्तन सेवा विनोदाचार्य ह.भ.प. शिवदास महाराज जंगले (मोठेवाडी) यांच्या

वडवणी : धुनकवाड येथे सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या सहाव्या दिवशीची कीर्तन सेवा विनोदाचार्य ह.भ.प. शिवदास महाराज जंगले (मोठेवाडी) यांच्या सुश्राव्य वाणीत भक्तिमय वातावरणात उत्साहात संपन्न झाली. या कीर्तनासाठी परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून अध्यात्मिक वातावरणाचा लाभ घेतला.
कीर्तनादरम्यान मार्गदर्शन करताना शिवदास महाराज जंगले म्हणाले की, धनसंपत्तीपेक्षा संतसंग श्रेष्ठ असून त्यातूनच खरा आनंद मिळतो.जीवनात भौतिक सुखांपेक्षा अध्यात्मिक समाधान अधिक महत्त्वाचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.छोट्या माणसाचा विचार करणाराच खर्या अर्थाने सर्वात मोठा असतो असे सांगत त्यांनी सामाजिक जाणीवेचा संदेश दिला.
तसेच ज्ञानेश्वर महाराज यांचा संदर्भ देत त्यांनी सांगितले की, ज्ञानेश्वर महाराज शरीराने पुरुष असले तरी त्यांचे हृदय आईसारखे करुणामय होते. प्रत्येकाने ज्ञानेश्वरीचे पारायण करून जीवनात योग्य दृष्टीकोन आत्मसात करावा असे आवाहन त्यांनी केले.
ज्ञानेश्वरीमध्ये केवळ गणिती संकल्पना नाहीत तर जीवन जगण्याचा दृष्टीकोन दिला आहे. साधूंचा महिमा सर्वांना सहज कळत नाही मात्र संत हे नेहमी समाजाच्या आणि संपूर्ण जगाच्या कल्याणाचा विचार करणारे असतात असेही ते म्हणाले.
यावेळी त्यांनी संत तुकाराम महाराज यांच्या प्रसिद्ध
हेचि दान देगा देवा तुझा विसर न व्हावा.या अभंगावर चिंतन केले.
या अभंगातून संत तुकारामांनी अखंड देवस्मरण, देवाच्या गुणांचे गान आणि संतसंगाचे महत्त्व अधोरेखित केले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मनुष्याने सतत देवाचे स्मरण ठेवत संतांच्या सहवासात राहिले तरच जीवनाला खरी दिशा आणि समाधान मिळते असा संदेश त्यांनी दिला.
या कीर्तनातून उपस्थित भाविकांना मोलाचे अध्यात्मिक मार्गदर्शन लाभले असून संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.
यावेळी पंचक्रोशीतील भाविक-भक्त, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS