आष्टी : कृषी विभागामार्फत वितरित करण्यात आलेल्या ज्वारीच्या बियाण्यांमुळे आष्टी तालुक्यातील शेतकर्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. या बियाण्यांप

आष्टी : कृषी विभागामार्फत वितरित करण्यात आलेल्या ज्वारीच्या बियाण्यांमुळे आष्टी तालुक्यातील शेतकर्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. या बियाण्यांपासून उगवलेली ज्वारी अपेक्षित वाढ न होता केवळ दीड फुटांपर्यंतच वाढून खुंटल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे. परिणामी धान्य उत्पादनासोबतच कडबा (पशुखाद्य) उत्पन्नही पूर्णपणे हाती आले नसून, शेतकरी गंभीर संकटात सापडले आहेत.
तालुक्यातील अनेक गावांमध्ये शेतकर्यांनी शासनावर विश्वास ठेवून कृषी विभागाकडून मिळालेली ज्वारीची बियाणे पेरली होती. मात्र पिकांची वाढ अत्यंत मर्यादित राहिली. ज्वारीची उंची वाढली नाही, कणसे नीट भरली नाहीत आणि कडबा तयार होण्याआधीच पिके निष्प्रभ ठरली. त्यामुळे रब्बी हंगाम पूर्णपणे वाया गेल्याची स्थिती निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे, या नुकसानीमुळे केवळ धान्य उत्पादनावरच परिणाम झाला नाही, तर कडबा न मिळाल्यामुळे गुरांच्या चार्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक शेतकर्यांना बाहेरून चारा खरेदी करावा लागत असून, त्यामुळे त्यांचा आर्थिक भार आणखी वाढला आहे. शेतकर्यांचा आरोप आहे की, संबंधित बियाणे निकृष्ट दर्जाचे किंवा बोगस असून त्याची योग्य तपासणी न करता वितरण करण्यात आले. यामुळे बियाणे, मशागत, मजुरी, खते व इतर खर्च वाया गेला आहे. आधीच सप्टेंबर महिन्यात झालेली अतिवृष्टीने खरीप हंगाम वाया गेला.आणि आत्ता वाढती महागाई यामुळे त्रस्त असलेल्या शेतकर्यांसाठी हा मोठा धक्का ठरला आहे. या पार्श्वभूमीवर शेतकर्यांना प्रशासनाने तातडीने पंचनामा करून नुकसानग्रस्तांना योग्य ती भरपाई देण्याची मागणी होत आहे. तसेच दोषी बियाणे पुरवठादार आणि संबंधित अधिकार्यांवर कठोर कारवाई करण्याचीही मागणी करण्यात येत आहे. दरम्यान याबाबतीत कृषी अधिकारी यांना भ्रमणध्वनीवर विचारलं असता त्यांच्या कडे बोलायला वेळ नव्हता.घडलेल्या या प्रकारामुळे कृषी विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आता प्रशासन यावर काय कारवाई करते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.शासनाच्या बियाण्यांनीच घात केला शेतकर्यांची ज्वारी पिकाची प्लॉटची प्लॉट वाया गेली. पिक नाही, कडबा नाही गुरांच्या चार्याचा प्रश्न गंभीर झाले आहे!

COMMENTS