बीड : स्व.यशवंतराव चव्हाण आणि युगपुरुष शरदचंद्र पवार यांचा वैचारीक वारसा पुढे चालवण्याचे काम अजित दादा पवार यांनी केले. शाहु-फुले-आंबेडकर यांचे प

बीड : स्व.यशवंतराव चव्हाण आणि युगपुरुष शरदचंद्र पवार यांचा वैचारीक वारसा पुढे चालवण्याचे काम अजित दादा पवार यांनी केले. शाहु-फुले-आंबेडकर यांचे पुरोगामी विचार आणि राज्य घटनेनुसार सार्वजनिक वर्तन हे अजित दादांच्या कार्यपध्दतीचे वैशिष्ट्य होते. प्रामुख्याने महिलांचा सन्मान करण्याची संस्कृती पवार कुटुंबाने वृध्दींगत केली.अजित दादांसारख्या नेतृत्वाची या राज्याला खर्या अर्थाने आज गरज असताना त्यांचे झालेले निधन ही फार मोठी हानी आहे. हा अपघात नव्हे तर घातपातच वाटतो. ज्यांनी कुणी हे घडवून आणले असेल त्यांना शिक्षा होण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करणे हीच दादांना खरी श्रध्दांजली ठरेल असे प्रतिपादन माजी आ.अॅड.उषाताई दराडे यांनी केले. अजित स्मृती व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प समर्पित करताना त्या बोलत होत्या.
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने बीडमध्ये लोकनेते अजित दादा पवार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ प्रत्येक महिन्याच्या 28 तारखेला व्याख्यानमालेच्या माध्यमातून स्मृतीदिन साजरा करण्यात येत आहे. 28 फेब्रुवारी रोजी समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याण काका आखाडे यांच्या व्याख्यानाने सुरुवात झाली. काल 28 मार्च रोजी अॅड.उषाताई दराडे यांना निमंत्रीत करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बीड न.प.चे उपाध्यक्ष विनोद मुळूक हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे, दै. सिटिझनचे संपादक शेख मुजीब,निमा डॉक्टर्स संघटनेचे अध्यक्ष डॉ.अजित जाधव , बीड न.प.चे स्वच्छता सभापती शेख निजाम,कल्याण काका आखाडे,सौ.प्रज्ञाताई खोसरे आदि मान्यवर उपस्थित होते. बीड जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष संतोष मानूरकर यांनी अजित दादांच्या जीवनावरील पुस्तक भेट देवून पाहुण्यांचे स्वागत केले. या प्रसंगी बोलतांना अॅड.दराडे म्हणाल्या की, अजित दादा पवार यांची खरी ओळख कामाचा माणूस हीच होती. आपल्या राजकिय जीवनात त्यांनी किती जणांना वैयक्तीक आणि सार्वजनिक मदत केली असेल याची मोजदाद होवू शकत नाही.आज दादांच्या निधनानंतर देशभरातील असंख्य लोक हळहळ व्यक्त करत आहेत. माझ्या व्यक्तीगत जीवनात मला विधान परिषदेवर आमदार करण्यामध्ये,राज्य महिला आयोगावर सदस्य करण्यामध्ये अजित दादांचे फार मोठे योगदान होते. माझ्या व्यक्तीगत जीवनात सुध्दा एका संकटातून त्यांनी मला बाहेर काढले होते. जेव्हा अजित दादा हे पवार साहेबांना सोडून दुसर्या मार्गाने गेले तेव्हा मी त्यांची राजकिय विरोधक म्हणून अनेकदा टिका केली. परंतु या टिकेला माझ्या घरातूनच माझ्या मुली विरोध करत होत्या. यावरुन दादांची लोकप्रियता लक्षात येते. आर.आर.पाटील, दिलीप वळसे पाटील,अनिल देशमुख,छगन भुजबळ या सहकार्यांसोबत दादांनी महाराष्ट्राचे राजकारण सामाजिक समतेच्या दिशेने पुढे नेले. त्यांच्या मनाला कधीही जातीयवादाने स्पर्श केला नाही. ते मुलत: पुरोगामी विचाराचे होते. अपघाती निधनापुर्वी त्यांनी राजकारणामध्ये ज्यांची साथ धरली होती त्यांना सोडून पुन्हा मुख्य प्रवाहात येण्याचे ठरवले होते. परंतु घात झाला. दादांच्या मृत्यूचे शल्य प्रत्येकाच्या मनात आहे. ज्यांनी कोणी हा घात केला असेल त्यांना शोधुन काढण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करण्याची गरज असल्याचे उषाताई म्हणाल्या. श्रीमती सुनेत्राताई पवार या सुध्दा पुरोगामी विचाराच्या असून भविष्यात महाराष्ट्राला सक्षम नेतृत्व देण्याची क्षमता त्यांच्यात आहे. त्यासाठी आपण सर्वजण सुनेत्राताईंच्या पाठीशी उभे राहू असेही अॅड.दराडे म्हणाल्या. या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक लोक पत्रकार भागवत तावरे यांनी केले. विनोद मुळूक यांनी अध्यक्षीय समारोप करताना अजित दादांच्या अनेक आठवणी सांगितल्या. पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे यांनी व्याख्यान माला आयोजित करण्या मागची भूमिका विशद केली.निमा संघटनेचे अध्यक्ष डॉ.अजित जाधव यांनी आपल्या भाषणात अजित दादांच्या सहवासात आलेले अनुभव सांगितले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन नितीन क्षीरसागर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रतिक कांबळे यांनी केले.भगवान विद्यालयातील विद्यार्थीनींनी या प्रसंगी सुश्राव्य गीत सादर केले.

COMMENTS