नांदेड स्थानिक प्राधिकारी विधान परिषद निवडणुकीत महायुतीने पुन्हा एकदा आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध करत भाजपचे उमेदवार तथा विद्यमान आमदार अमरनाथ र

नांदेड स्थानिक प्राधिकारी विधान परिषद निवडणुकीत महायुतीने पुन्हा एकदा आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध करत भाजपचे उमेदवार तथा विद्यमान आमदार अमरनाथ राजुरकर यांना सलग तिसर्यांदा विधान परिषदेवर पाठविण्यात यश मिळविले. 452 पैकी 451 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून, त्यापैकी 23 मते अवैध ठरली. वैध मतांपैकी अमरनाथ राजुरकर यांनी तब्बल 339 मते मिळवत दणदणीत विजय मिळविला. महाविकास आघाडीचे उमेदवार कृष्णा पाटील आष्टीकर यांना 84, तर वंचित बहुजन आघाडीचे प्रशांत इंगोले यांना अवघी पाच मते मिळाली.
या निकालाने केवळ महायुतीच्या संघटनशक्तीची प्रचिती दिली नाही, तर विरोधकांच्या मतांमध्ये झालेली फूट आणि भाजपने आखलेल्या सूक्ष्म राजकीय रणनीतीचेही दर्शन घडविले. निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीने अपेक्षित मतांचे गणित मांडले होते. मात्र, प्रत्यक्ष निकालात आघाडीच्या गोटातील तब्बल 42 मते अपेक्षेप्रमाणे उमेदवाराकडे न वळल्याचे स्पष्ट झाले. वंचित बहुजन आघाडीच्या मतांमध्येही फूट पडल्याचे चित्र समोर आले. त्यामुळे विरोधी गोटातील मतांचे व्यवस्थापन करण्यात महाविकास आघाडीला अपयश आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. या विजयामागे राज्यसभा खासदार अशोकराव चव्हाण यांचे पडद्यामागील नियोजन आणि समन्वय निर्णायक ठरल्याचे मानले जात आहे. विविध राजकीय घटकांमध्ये समतोल राखत महायुतीतील सर्व घटक पक्षांची मते एकसंध ठेवण्याबरोबरच विरोधी गोटातील नाराज मतदारांशी संवाद साधून त्यांना महायुतीच्या बाजूने वळविण्याची रणनीती यशस्वी ठरल्याचे बोलले जात आहे. माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या प्रभावक्षेत्रातील सुमारे 84 मते महायुतीच्या पारड्यात पडल्याची चर्चा आहे. याशिवाय आमदार बालाजी कल्याणकर, आमदार आनंद पाटील बोंढारकर आणि आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी शिवसेनेशी संबंधित 23 मतांचे प्रभावी व्यवस्थापन केल्याचे सांगितले जात आहे. मराठवाडा जनहित पार्टीची 39 मते एकगठ्ठा मिळाल्यामुळे राजुरकर यांच्या विजयाची वाट आणखी सुकर झाली. विशेष म्हणजे, राजुरकर यांना अपेक्षित गणितापेक्षा सुमारे 51 अतिरिक्त मते मिळाल्याने राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे. ही मते नेमकी कोणत्या पक्ष किंवा गटाकडून आली, याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. एमआयएमच्या 20 मतांचे विभाजन कोणत्या उमेदवारांच्या बाजूने झाले, तसेच 14 अपक्ष नगरसेवकांनी कोणाला साथ दिली, याबाबतही राजकीय चर्चा रंगत आहेत. दरम्यान, महाविकास आघाडीचे उमेदवार कृष्णा पाटील आष्टीकर यांचा झालेला पराभव आणि त्यानंतर उद्भवलेल्या राजकीय घडामोडींमुळे विरोधी गोटातील अंतर्गत मतभेद अधिक ठळकपणे समोर आले आहेत. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीसमोर संघटनात्मक एकजूट टिकविण्याचे मोठे आव्हान उभे राहणार असल्याचे जाणकारांचे मत आहे. सलग तिसर्यांदा मिळालेल्या या विजयामुळे अमरनाथ राजुरकर यांनी नांदेडच्या राजकारणात आपले स्थान अधिक मजबूत केले असून, महायुतीने संघटनात्मक ताकद, मतांचे प्रभावी व्यवस्थापन आणि सूक्ष्म नियोजनाच्या बळावर विरोधकांना मोठा धक्का दिल्याचे स्पष्ट झाले आहे.
खा. अशोकराव चव्हाण
महायुतीचे उमेदवार अमरनाथ राजुरकर यांच्या विजयाबद्दल समाधान व्यक्त करत राज्यसभा खासदार अशोकराव चव्हाण यांनी हा विजय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावरील विश्वास, महायुती सरकारच्या विकासाभिमुख धोरणांची पावती आणि कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमांचे फळ असल्याचे म्हटले आहे. नांदेड स्थानिक स्वराज्य मतदारसंघात मिळालेल्या प्रचंड मताधिक्यामुळे महायुतीतील सर्व घटक पक्षांतील समन्वय आणि संघटनात्मक ताकद अधोरेखित झाल्याचे त्यांनी नमूद केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण तसेच महायुतीतील सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे योगदान या विजयामागे महत्त्वाचे ठरल्याचे सांगत त्यांनी सर्वांचे अभिनंदन व आभार व्यक्त केले.

COMMENTS