नांदेड : खरीप हंगामाच्या तोंडावर नांदेड जिल्ह्यात कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी पुकारलेल्या बेमुदत बंदमुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झा
नांदेड : खरीप हंगामाच्या तोंडावर नांदेड जिल्ह्यात कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी पुकारलेल्या बेमुदत बंदमुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. महाराष्ट्र फर्टिलायझर्स, पेस्टीसाईड्स, सीड्स डीलर्स असोसिएशनच्या राज्यव्यापी आंदोलनाला नांदेड जिल्ह्यातही मोठा प्रतिसाद मिळत असून, जिल्ह्यातील कृषी दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे बियाणे, खते आणि कीटकनाशकांच्या खरेदीसाठी शेतकर्यांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
’नांदेड कृषी निविष्ठा खते, बियाणे, कीटकनाशके विक्रेते असोसिएशन’ने 27 एप्रिलपासून या आंदोलनात सहभागी होत जिल्हा कृषी विकास अधिकार्यांना अधिकृत पत्र दिले आहे. विक्रेत्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासन आणि कृषी विभाग सातत्याने दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. गेल्या चार ते पाच वर्षांपासून निवेदने, बैठका आणि चर्चांद्वारे प्रश्न मांडूनही कोणताही ठोस निर्णय न झाल्याने अखेर संपाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे. दरम्यान, खरीप हंगामासाठी शेतकरी सध्या बियाणे व खतांची जुळवाजुळव करत असताना अचानक बंदमुळे अडचणी वाढल्या आहेत. अनेक ग्रामीण भागातील शेतकरी तालुक्याच्या ठिकाणी येऊन रिकाम्या हाताने परतत असल्याचे चित्र दिसून येत आहे. पेरणीपूर्व नियोजनात यामुळे अडथळे निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. विक्रेत्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये रासायनिक खतांच्या विक्रीतील लिंकिंग तातडीने बंद करणे, अनधिकृत एचटीबीटी कपाशी बियाण्यांवर कडक कारवाई, ’साथी पोर्टल’चा सक्तीचा वापर मर्यादित करणे, खत पुरवठा एफओआर पद्धतीने करणे, वाढत्या खर्चानुसार विक्री मार्जिन वाढविणे, तपासणीबाबतच्या जाचक अधिसूचना रद्द करणे तसेच युरिया व डीएपी खत वितरणाबाबत स्पष्ट धोरण जाहीर करणे या मागण्यांचा समावेश आहे. जिल्हा असोसिएशनचे अध्यक्ष श्रीधरराव नागपूरकर, उपाध्यक्ष श्रीकांत पाटील उमरेकर, सचिव सतीश निलावार यांनी आंदोलन मागे घेण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय नसल्याचे सांगितले. मागण्यांची दखल घेतली जात नाही तोपर्यंत दुकाने बंदच राहतील, असा इशारा त्यांनी दिला आहे. प्रशासनाने तातडीने मध्यस्थी करून प्रश्न सोडवले नाहीत, तर खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच शेतकरी आणि बाजारव्यवस्था दोन्ही संकटछायेत जाण्याची भीती व्यक्त होत आहे.

COMMENTS