श्रीगोंदा : वस्तूंवरील छापील कमाल किरकोळ किंमतीपेक्षा (एमआरपी) अधिक दर आकारून ग्राहकांची होत असलेली आर्थिक फसवणूक तातडीने थांबवावी, तसेच एमआरपी स

श्रीगोंदा : वस्तूंवरील छापील कमाल किरकोळ किंमतीपेक्षा (एमआरपी) अधिक दर आकारून ग्राहकांची होत असलेली आर्थिक फसवणूक तातडीने थांबवावी, तसेच एमआरपी संदर्भात देशात सक्षम व कठोर कायदा करण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी अखिल भारतीय ग्राहक पंचायत, अहिल्यानगर जिल्हा शाखेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शांततापूर्ण जनजागृती आंदोलन करण्यात आले. आंदोलनादरम्यान विविध ग्राहकहिताच्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले.
अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे जिल्हाध्यक्ष शाहूराव औटी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात ग्राहकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित अनेक गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले. बाजारपेठेत अनेक ठिकाणी ग्राहकांकडून वस्तूंवरील छापील किंमतीपेक्षा जास्त दर आकारले जात असून, किमतींमधील पारदर्शकतेचा अभाव आणि खोट्या सवलतींच्या माध्यमातून ग्राहकांची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला.
निवेदनात केंद्र शासनाने एमआरपी विषयक सक्षम व सुधारित कायदा तातडीने लागू करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच वस्तूंवरील एमआरपीची पडताळणी करण्यासाठी स्वतंत्र वैधानिक प्राधिकरणाची स्थापना करण्यात यावी, जेणेकरून उत्पादक आणि विक्रेत्यांकडून होणाऱ्या गैरप्रकारांवर प्रभावी नियंत्रण ठेवता येईल, असेही नमूद करण्यात आले.
यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना जिल्हाध्यक्ष शाहूराव औटी म्हणाले, ग्राहकांच्या हक्कांचे संरक्षण व्हावे, त्यांच्यामध्ये जागरूकता निर्माण व्हावी आणि ग्राहकांना न्याय मिळावा यासाठी आम्ही संविधानिक व शांततेच्या मार्गाने आंदोलन करीत आहोत. प्रशासनाने या आंदोलनाची गांभीर्याने दखल घेऊन ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर आणि कंपन्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यासाठी हे निवेदन केंद्र व राज्य शासनाकडे तातडीने पाठवावे, अशी मागणी ग्राहक पंचायतच्या वतीने करण्यात आली.
या आंदोलनात ग्राहक पंचायतचे जिल्हाध्यक्ष शाहूराव औटी, प्रांत कोषाध्यक्ष विलास जगदाळे, सचिव दिनेश थोरात, प्रांत कार्यकारिणी सदस्य अतुल कुऱ्हाडे, महिला अध्यक्षा अमिता कोहली, पद्मा दायमा, उपाध्यक्ष अशोक शेवाळे, सुरेश रहाणे, सहसचिव जितेंद्र पितळे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने जागरूक नागरिक सहभागी झाले होते.

COMMENTS