संगमनेर : सेवानिवृत्ती हा जीवनातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. तिथून पुढे आयुष्याचा आणखी एक नवीन टप्पा सुरू होतो. या काळात सर्वांनी चांगले आरोग्य ठे

संगमनेर : सेवानिवृत्ती हा जीवनातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. तिथून पुढे आयुष्याचा आणखी एक नवीन टप्पा सुरू होतो. या काळात सर्वांनी चांगले आरोग्य ठेवणे गरजेचे असून तालुक्याची समृद्ध विचारधारा जोपासली पाहिजे. सातत्याने विविध विकास योजना राबवून संगमनेर तालुका राज्यात अग्रगण्य बनवला आहे. गोरगरीब माणसाच्या जीवनात आनंद निर्माण करताना हा तालुका आपण नेहमी कुटुंबाप्रमाणे सांभाळला आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते व माजी महसूल व कृषीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये आयोजित २६ कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती आणि सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कारखान्याचे व्हाईस चेअरमन पांडुरंग पाटील घुले होते. तर व्यासपीठावर राज्य साखर संघाचे उपाध्यक्ष बाबासाहेब ओहोळ, संचालक संपतराव गोडगे, नवनाथ आरगडे, विनोद हासे, योगेश भालेराव, रामनाथ कुटे, विजय राहणे, विलास शिंदे, सेक्रेटरी किरण कानवडे, कृष्णा दिघे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य लोकनेते बाळासाहेब थोरात म्हणाले की, संगमनेर तालुक्याला समृद्ध नेतृत्वाची परंपरा लाभली असून आपण नेहमीच राजकारणाची एक चांगली संस्कृती निर्माण केली आहे. जनता, शेतकरी आणि कामगारांच्या पाठबळामुळेच तालुका शिक्षण, सहकार, आर्थिक समृद्धी, दूध व्यवसाय व शेती अशा सर्वच क्षेत्रात अव्वल ठरला आहे. कारखान्यातील अनेक कामगारांची मुले आज उच्च पदावर कार्यरत असून सर्वांची कुटुंबे समृद्ध झाली आहेत. संगमनेर हा आपला परिवार असून यापुढेही आपल्याला ही समृद्धी जपायची आहे.
या सोहळ्यात सर्व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा ‘अमृत मंथन अमृत गाथा’ हे पुस्तक, शाल, बुके आणि आंब्याचे रोप देऊन त्यांच्या कुटुंबीयांसह गौरव करण्यात आला. यावेळी अनेक कर्मचाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना कारखान्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी केले, सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले, तर आभार पांडुरंग पाटील घुले यांनी मानले.

COMMENTS