बीड : तालुक्यातील पाटोदा येथील सुविधा केंद्रात कामगारांच्या नोंदणी पडताळणीच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरप्रकार सुरू असल्याचा गंभीर आरोप

बीड : तालुक्यातील पाटोदा येथील सुविधा केंद्रात कामगारांच्या नोंदणी पडताळणीच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरप्रकार सुरू असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. शिवसेना (शिंदे गट) कामगार जिल्हाप्रमुख सचिन बोबडे यांनी या प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
बोबडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सुविधा केंद्रातील काही कर्मचारी संगनमताने कामगारांकडून प्रति अर्ज सुमारे 500 रुपये घेत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. सरकारी सेवा मोफत असताना अशा प्रकारे पैसे उकळणे ही थेट कामगारांची लूट असल्याचा आरोप त्यांनी केला. या प्रकरणात पाटोदा सुविधा केंद्राचे कंत्राटी इन्चार्ज फरहान पठाण यांच्यासह इतर ऑपरेटर व हेल्पर कर्मचार्यांवरही गंभीर आरोप करण्यात आले आहेत. पडताळणीसाठी आलेल्या कामगारांना तुमची कागदपत्रे बोगस आहेत, गुन्हा दाखल करू का किंवा ग्रामसेवकांकडून चौकशी लावतो, अशा शब्दांत धमकावून मानसिक दबाव आणला जात असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या भीतीमुळे अनेक कामगार वेठीस धरले जात असून, पडताळणीची प्रक्रिया जाणीवपूर्वक विलंबित करून पैसे उकळले जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, जे कामगार पैसे देतात त्यांचे अर्ज सर्व मूळ कागदपत्रे योग्य असा शेरा देऊन पुढे पाठवले जातात, तर पैसे देण्यास नकार देणार्यांचे अर्ज स्वाक्षरीत तफावत अशा कारणांवर प्रलंबित ठेवले जातात किंवा नाकारले जातात. याशिवाय, कामगारांना दिल्या जाणार्या पडताळणी पत्रावर मात्र सर्व मूळ कागदपत्रे योग्य असा शिक्का मारला जात असल्याने संपूर्ण प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कंत्राटी इन्चार्जला कामगारांच्या 90 दिवसांच्या कामाच्या प्रमाणपत्रांची वैधता ठरवण्याचा अधिकार कोणी दिला, असा सवालही बोबडे यांनी उपस्थित केला आहे. अशा प्रकारचे अधिकार नसताना मनमानी पद्धतीने निर्णय घेतले जात असल्यामुळेच या अधिकाराचा गैरवापर करून पैसे उकळण्याचा प्रकार सुरू आहे, असे बोबडे यांनी स्पष्ट केले. सरकारी सेवा मोफत असताना कामगारांना धमकावून पैसे उकळणे ही अत्यंत गंभीर बाब असून प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करावा, अशी मागणी त्यांनी केली. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित कंत्राटी कर्मचारी व अधिकार्यांवर-फरहान पठाण, जाधव, शेजवळ, गवळी तसेच इतर संबंधितांवर-कठोर कारवाई करावी, अन्यथा शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही बोबडे यांनी दिला आहे. दरम्यान, कामगारांकडून घेतलेल्या पैशांचे काही पुरावे प्रशासनाकडे सादर करण्यात आल्याची माहिती समोर येत असून, या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन संबंधितांना न्याय मिळावा, अशी मागणी आता जोर धरत आहे.

COMMENTS