कर्जत : तालुक्यातील दुरगाव येथील मुस्लिम वस्तीमध्ये सावत्र आईला मुलांसह अन्य कुटुंबीयांनी बेदम मारहाण करून थेट जंगलात नेऊन सोडल्याचा धक्कादायक आण

कर्जत : तालुक्यातील दुरगाव येथील मुस्लिम वस्तीमध्ये सावत्र आईला मुलांसह अन्य कुटुंबीयांनी बेदम मारहाण करून थेट जंगलात नेऊन सोडल्याचा धक्कादायक आणि गंभीर प्रकार समोर आला आहे. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या साफिया रशीद शेख यांच्यावर कर्जत उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेला तीन दिवस उलटूनही पोलिसांनी कोणतीही ठोस कारवाई केली नसल्याची तक्रार पीडित महिला आणि त्यांचे पती रशीद जानू शेख यांनी केली आहे.
साफिया शेख आणि रशीद शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार, साफिया या सावत्र आई असल्याच्या कारणावरून तसेच रशीद शेख यांनी त्यांच्याशी विवाह केल्याचा राग मनात धरून मुलांसह इतर नातेवाईकांकडून त्यांना सातत्याने त्रास दिला जात होता. या संदर्भात सोमवारी कर्जत पोलीस ठाण्यात तक्रारही देण्यात आली होती. मात्र, मंगळवारी सकाळी साफिया शेख या घरात नमाज पठण करत असताना दाऊद रशीद शेख, हकीम रशीद शेख, निलू दाऊद शेख, करिष्मा हकीम शेख, जानू सुलतान शेख आणि म्हैतबी जानू शेख यांनी घरात घुसून त्यांना शिवीगाळ करत काठीने बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे.
मारहाणीनंतर आरोपींनी साफिया यांचे हात-पाय बांधून वाहनातून नेऊन एका जंगल परिसरात सोडले व पुन्हा घरी आल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. जंगलात गुरे चारणाऱ्या दोन मुलांनी त्यांना पाहिले आणि त्यांची सुटका केली, त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. या मारहाणीव्यतिरिक्त आरोपींनी घर, जमीन, दुचाकी, धान्य आणि रोख रक्कमही बळकावल्याचा आरोप शेख दाम्पत्याने केला आहे. पीडित दाम्पत्याने पत्रकारांसमोर न्यायाची गुहार लावली आहे.

COMMENTS