नांदेड: देगलूर ते कर्नाटक राज्यसीमा या महत्त्वपूर्ण मार्गाच्या विकासासाठी बजेट मंजुरी मिळाल्याने नांदेड-बिदर महामार्गाच्या उन्नतीकरणाच्या कामाला

नांदेड: देगलूर ते कर्नाटक राज्यसीमा या महत्त्वपूर्ण मार्गाच्या विकासासाठी बजेट मंजुरी मिळाल्याने नांदेड-बिदर महामार्गाच्या उन्नतीकरणाच्या कामाला मोठी गती मिळाली आहे. या प्रकल्पांतर्गत देगलूर-करडखेड-मरखेल-हाणेगाव ते कर्नाटक राज्यसीमा या मार्गाचा दर्जेदार विकास करण्यात येणार आहे. खा. डॉ. अजित गोपछडे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या सहाय्यित योजनेअंतर्गत या मार्गासाठी आवश्यक निधीला मंजुरी मिळाली आहे.
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या अनुषंगाने राज्यसभा खासदार डॉ. अजित गोपछडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची सदिच्छा भेट घेऊन विशेष स्मृतिचित्र भेट देत सत्कार केला व आभार मानले. या महामार्गाच्या उन्नतीकरणासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी केलेल्या सहकार्याची त्यांनी विशेष दखल घेतली.
दोन प्रमुख शीख तीर्थक्षेत्रे जोडली जाणार; दळणवळणाला मिळणार गती
नांदेड-बिदर महामार्ग हा तख्त सचखंड श्री हजूर साहिब (नांदेड) आणि गुरुद्वारा श्री नानक झिरा साहिब (बिदर) या दोन महत्त्वाच्या शीख तीर्थक्षेत्रांना जोडणारा मार्ग असल्याने धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा आहे. या मार्गावरील सुमारे २० किलोमीटरचा अत्यंत जीर्ण आणि दयनीय अवस्थेतील भाग आता आधुनिक महामार्गाच्या निकषांनुसार विकसित केला जाणार आहे. गेल्या अनेक दशकांपासून या मार्गाची दुरवस्था झाल्याने प्रवाशांना खड्डे आणि अपघातांचा सामना करावा लागत होता.
आता या महामार्गाच्या विकासामुळे धार्मिक पर्यटनाला चालना मिळण्यासोबतच सीमावर्ती भागातील व्यापार, उद्योग, शिक्षण आणि पर्यटन क्षेत्रालाही नवी ऊर्जा मिळणार आहे. यामुळे वाहतूक खर्चात बचत आणि प्रवासाच्या वेळेत कपात होणार असून, हा प्रकल्प आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक प्रगतीसाठी मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास खा. डॉ. अजित गोपछडे यांनी व्यक्त केला आहे.

COMMENTS