कोपरगाव : “आमच्या कारभारात गैरप्रकार आढळल्यास आम्ही राजीनामा देण्यास तयार आहोत. मात्र विरोधकांनीही त्यांच्या कारकिर्दीतील कामांचा हिशेब देण्याची

कोपरगाव : “आमच्या कारभारात गैरप्रकार आढळल्यास आम्ही राजीनामा देण्यास तयार आहोत. मात्र विरोधकांनीही त्यांच्या कारकिर्दीतील कामांचा हिशेब देण्याची तयारी दाखवावी,” असे खुले आव्हान कोपरगावचे नगराध्यक्ष पराग संधान यांनी दिले आहे.
नगराध्यक्ष संधान व नगरसेवकांनी संयुक्त पत्रकार परिषदेत नगरपालिकेच्या गेल्या चार महिन्यांतील कामकाजाचा आढावा घेतला. माजी आमदार स्नेहलता कोल्हे व आमदार विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील विविध विकासकामांचा पाठपुरावा सुरू असून जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे संधान यांनी सांगितले.
चार महिन्यांतील विकासकामे आणि उपाययोजना:
- स्वच्छता मोहीम : शहरातील स्वच्छता व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आले असून घंटागाड्यांची संख्याही वाढविण्यात आली आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नालेसफाई मोहीम गतीने सुरू आहे. गेल्या चार महिन्यांत शहरात ७२६ कचरापेट्या बसविण्यात आल्या आहेत.
- पाणीपुरवठा : पाणीपुरवठा व्यवस्थेतील त्रुटी दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू असून नवीन पाण्याच्या टाक्या कार्यान्वित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पाच क्रमांकाच्या तलावाची आवश्यक चाचणी पूर्ण करण्यात आली असून त्याचा अहवाल लवकरच अपेक्षित आहे.
- स्वच्छतागृहे व आरोग्य : शहरात अद्ययावत सार्वजनिक स्वच्छतागृहे उभारण्याचा निर्णय घेण्यात आला असून ७५ स्वच्छतागृहांना मंजुरी मिळाली आहे. आणखी ७५ स्वच्छतागृहांसाठी पाठपुरावा सुरू असून शहरात रुग्णवाहिका सेवाही सुरू करण्यात आली आहे.
या पत्रकार परिषदेस बबलू वाणी, अतुल काले, विनोद राक्षे, संदीप देवकर, अनिल आव्हाड, रवींद्र कथले, कैलास मंजुळ, सुरेखा राक्षे, विजया देवकर, निलोफर पठाण, स्वप्निल मंजुळ यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS