माजंलगाव येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सर्वसामान्य रुग्णांना मिळणार्या सेवांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत असून, गरीब रुग्णांची होत असलेली गैरसोय आ

माजंलगाव येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सर्वसामान्य रुग्णांना मिळणार्या सेवांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत असून, गरीब रुग्णांची होत असलेली गैरसोय आता उघडकीस येत आहे. सरकारी रुग्णालय असूनही येथे अपेक्षित उपचार मिळत नसल्याच्या तक्रारींनी जोर धरला आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, नॉर्मल डिलिव्हरीसाठी दाखल झालेल्या गर्भवती महिलांना कोणतेही ठोस कारण न देता इतर रुग्णालयांकडे रेफर केले जात आहे. यामुळे गरीब कुटुंबांवर आर्थिक भार वाढत आहे. त्याचप्रमाणे, छोट्या-मोठ्या ऑपरेशनसाठी आलेल्या रुग्णांना देखील जिल्हा रुग्णालय किंवा आंबेजोगाई रुग्णालयात पाठवले जात असल्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांचा आरोप आहे की, हॉस्पिटलमधील काही कर्मचारी योग्य मार्गदर्शन देण्याऐवजी रुग्णांना वेगवेगळ्या काउंटरवर पाठवत आहेत, ज्यामुळे रुग्णांची प्रचंड गैरसोय होत आहे. उपचारासाठी आलेल्या रुग्णांना तासन्तास थांबावे लागत आहे, तर काही वेळा निराश होऊन परत जावे लागत आहे. विशेष म्हणजे, हे सिव्हिल हॉस्पिटल सरकारी निधीतून चालते आणि सर्वसामान्य जनतेच्या कराच्या पैशातून उभारण्यात आले आहे. तरीदेखील, येथे मूलभूत आरोग्य सुविधा उपलब्ध नसल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. जर छोट्या-छोट्या उपचारांसाठीच रुग्णांना रेफर करायचे असेल, तर एवढ्या मोठ्या सिव्हिल हॉस्पिटलचा उपयोग काय? असा थेट सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

COMMENTS