जामखेड : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती आणि अधिक मासाचे औचित्य साधून विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या पुढाकाराने चौंडी येथे गावच

जामखेड : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती आणि अधिक मासाचे औचित्य साधून विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या पुढाकाराने चौंडी येथे गावच्या लेक-जावयांसाठी आयोजित करण्यात आलेला धोंडे जेवणाचा सन्मान सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला. गावाने आपल्या लेक-जावयांचा अशा प्रकारे एकत्रित सन्मान करण्याचा हा राज्यातील बहुधा पहिलाच अनोखा उपक्रम ठरल्याने उपस्थितांकडून त्याचे विशेष कौतुक करण्यात आले.
या सोहळ्यास चौंडी, कर्जत-जामखेड परिसर, अहिल्यानगर शहर व जिल्ह्यासह पुणे, बारामती, करमाळा, मुंबई आदी ठिकाणांहून विविध समाजघटकांतील सुमारे ७०० लेक-जावई उपस्थित होते. त्यांच्या कुटुंबीयांसह साडेतीन ते चार हजार नागरिक या ऐतिहासिक कार्यक्रमात सहभागी झाले होते. आई-वडील, भाऊ, नातेवाईक आणि जुन्या मैत्रिणींची भेट झाल्याने अनेक लेकी भावूक झाल्या होत्या, तर गावकऱ्यांनी केलेल्या या अभूतपूर्व सन्मानाने जावईही भारावून गेले. पारंपरिक वाद्यांच्या गजरात गावातून मिरवणूक काढण्यात आली आणि जुन्या-नव्या गीतांच्या सुरावटींवर लेकीबाळींनी फुगड्यांचा आनंद लुटला.
१०० किलो पुरण !
या विशेष सोहळ्यानिमित्त उपस्थित सर्वांसाठी तब्बल १०० किलो पुरण, पुरणाचा धोंडा, पुरणपोळी, साजूक तूप, दूध-गुळवणी, कटाची आमटी, भात, भजी, पापड आणि कुरडई असा पारंपरिक भोजनाचा भरगच्च बेत ठेवण्यात आला होता. “गावच्या लेकींचा भाऊ या नात्याने हा धोंडे जेवणाचा सन्मान सोहळा आयोजित केला. माहेर आणि सासरची नाती जपत गावाचा लौकिक वाढविणाऱ्या लेकींचा सन्मान करण्याची संधी मिळाली, याचा आनंद आहे. चौंडीच्या सर्वांगीण विकासासाठी विविध कामे सुरू असून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मभूमीला वैशिष्ट्यपूर्ण ओळख मिळवून देण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. गावच्या लेक-जावयांनी कुटुंबीयांसह नियमितपणे चौंडीला भेट देऊन गावाच्या विकासात सहभागी व्हावे.” – सभापती प्रा. राम शिंदे

COMMENTS