Homeताज्या बातम्या

विधानपरिषदेच्या निवडणुका आता मराठी माणसाच्या ऐपती आणि अवकातीच्या बाहेर गेल्या आहेत!-आ. हेमंत पाटीलकोळशाच्या दलालीत हात काळे करणार नाही!

नांदेड : नांदेड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे (शिंदे गट) विधान परिषदेचे आमदार हेमंत पाटील यां

तृणमूल काँग्रेसमध्ये फूट; 20 खासदार देणार एनडीएला पाठिंबा
तृणमूलच्या प्रतोदपदी कल्याण बॅनर्जी20 खासदारांच्या बंडांनंतर ममता बॅनर्जी यांचा निर्णय
शिवसेना ओबीसी बारा बलुतेदार विभागाच्या महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुखपदी पत्रकार अनिल धमने


नांदेड : नांदेड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे (शिंदे गट) विधान परिषदेचे आमदार हेमंत पाटील यांनी केलेल्या परखड विधानाने राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे.
सत्ताधारी महायुतीचाच एक आमदार उघडपणे मोठा बाजार भरला आहे आणि कोळशाच्या दलालीत हात काळे करायचे नाहीत असे म्हणत असेल, तर हा केवळ एका व्यक्तीचा उद्रेक नसून सध्याच्या राजकीय व्यवस्थेवरच उपस्थित झालेला गंभीर प्रश्न असल्य9ाची चर्चा सुरू झाली आहे. राजकारणातील बदलत्या निष्ठा, वाढलेला आर्थिक हस्तक्षेप, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमधील कथित घोडेबाजार आणि कार्यकर्त्यांऐवजी आर्थिक ताकदीच्या जोरावर घडणारी समीकरणे याविषयी आ. हेमंत पाटील यांनी व्यक्त केलेली नाराजी आता महायुतीसाठीच अस्वस्थ करणारी ठरत आहे. विशेष म्हणजे, हे आरोप विरोधी पक्षाकडून नव्हे, तर सत्ताधारी आघाडीतील एका विद्यमान आमदाराकडून समोर आल्यामुळे त्याचे राजकीय पडसाद अधिक तीव्र उमटत आहेत. एका वृत्तवाहिनीशी बोलताना आ. पाटील यांनी स्पष्ट शब्दांत म्हटले की, विधान परिषदेच्या निवडणुका आता मराठी माणसाच्या ऐपती व अवकातीच्या बाहेर गेल्या आहेत. या निवडणुकांमध्ये मोठा बाजार भरला असून, त्या कोळशाच्या दलालीत मला माझे हात काळे करायचे नाहीत. त्यांच्या या विधानाने निवडणूक प्रक्रियेभोवती कायम चर्चेत राहणार्‍या पैशाच्या राजकारणाच्या मुद्द्याला पुन्हा एकदा तोंड फुटले आहे. विशेष म्हणजे, विधान परिषदेचे विद्यमान सदस्य असलेल्या व्यक्तीकडूनच निवडणूक प्रक्रियेवर अशा प्रकारचे प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. सत्तेच्या केंद्रस्थानी असणार्‍या पक्षातील आमदारालाच जर या प्रक्रियेबाबत इतका भ्रमनिरास झाला असेल, तर सामान्य कार्यकर्त्यांची अवस्था काय असेल, असा सवाल आता राजकीय जाणकारांकडून उपस्थित केला जात आहे. जिल्ह्यातील बदलत्या राजकीय समीकरणांवर भाष्य करताना आ. पाटील यांनी नांदेडमधील नेतृत्वावरच अप्रत्यक्ष अविश्वास व्यक्त केला. आज कोण कुणासोबत आहे आणि उद्या कोण कोणत्या तंबूत जाऊन बसेल याचा काहीच भरवसा राहिलेला नाही. नांदेडमध्ये सध्या कुठल्याच राजकारण्यांवर विश्वास ठेवण्याची परिस्थिती राहिलेली नाही, असे ते म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यामुळे जिल्ह्यातील राजकीय मैत्री आणि शत्रुत्वाचे बदलते रंग पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. कालपर्यंत एकमेकांवर टीकेची झोड उठविणारे नेते आज एकाच व्यासपीठावर खांद्याला खांदा लावून उभे राहत असल्याचे चित्र नांदेडमध्ये पाहायला मिळत आहे. विचारधारा, भूमिका आणि जनतेला दिलेली आश्वासने यापेक्षा राजकीय सोय आणि सत्तेची गणिते महत्त्वाची ठरत असल्याची टीका सातत्याने होत असताना, त्याच पार्श्वभूमीवर आ. हेमंत पाटील यांनी व्यक्त केलेली खंत अनेक अर्थांनी महत्त्वाची मानली जात आहे. आपली भूमिका स्पष्ट करताना त्यांनी पक्षप्रमुख तथा उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला. पक्षप्रमुख जे ठरवतील तीच आमची भूमिका असेल. आम्ही महायुतीसोबत आहोत. लोकसभेत माझ्यावर अन्याय झाला होता, मात्र एकनाथ शिंदे यांनी मला विधान परिषदेवर पाठवून न्याय दिला, असे ते म्हणाले. मात्र, त्याचवेळी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता सामान्य कार्यकर्त्यांच्या आवाक्याबाहेर गेल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. महाराष्ट्राच्या राजकारणाचा अक्षरशः सुतडा झाला आहे, असे म्हणत आ. पाटील यांनी सध्याच्या राजकीय संस्कृतीवरच ताशेरे ओढले. त्यांच्या या वक्तव्यातून केवळ नाराजी नव्हे, तर राजकारणातील वाढत्या व्यवहारशाहीविरोधातील अस्वस्थता प्रकर्षाने दिसून आली. निवडणुका म्हणजे विचारांचा उत्सव की पैशाचा खेळ, असा प्रश्न आता पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. महत्त्वाचे म्हणजे, महायुतीतील सर्वच घटक पक्ष विधान परिषद निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी करत असताना, त्याच आघाडीतील एका आमदारानेच निवडणूक प्रक्रियेवर उघडपणे प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. हे केवळ वैयक्तिक मत आहे की सत्ताधारी आघाडीतील वाढत्या अस्वस्थतेचे प्रतिबिंब, याबाबत चर्चा रंगू लागली आहे. नांदेडपासून मंत्रालयापर्यंत सध्या एकाच प्रश्नाची चर्चा सुरू आहे.जर सत्ताधारी पक्षातील आमदारालाच विधान परिषद निवडणुकांमधील कथित बाजारपेठेचा इतका वीट आला असेल, तर राज्याच्या राजकारणात नेमके सुरू काय आहे? आणि आ. हेमंत पाटील यांनी केलेला हा घरचा आहेर भविष्यातील मोठ्या राजकीय घडामोडींची नांदी ठरणार का? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

COMMENTS