कर्जत : तालुक्यातील नागमठाण (खुळ्याचा गोठा) येथील शेतकरी उमाजी खुळे यांच्यावर निसर्गाचा मोठा आघात झाला असून, वाढत्या तीव्र उष्णतेमुळे त्यांच्या श

कर्जत : तालुक्यातील नागमठाण (खुळ्याचा गोठा) येथील शेतकरी उमाजी खुळे यांच्यावर निसर्गाचा मोठा आघात झाला असून, वाढत्या तीव्र उष्णतेमुळे त्यांच्या शेतात साठवून ठेवलेला कांदा मोठ्या प्रमाणात सडला आहे. या घटनेत तब्बल ४०० हून अधिक गोण्या कांदा खराब झाला असून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याने खुळे कुटुंब आर्थिक संकटात सापडले आहे.
यंदा कांदा उत्पादक शेतकरी आधीच बाजारातील घसरलेल्या दरांमुळे अडचणीत असताना, आता उष्णतेच्या तडाख्यामुळे साठवलेल्या कांद्याचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट उभे राहिले आहे.
उमाजी खुळे यांनी आपल्या एक हेक्टर क्षेत्रात कांद्याची लागवड केली होती. मोठ्या मेहनतीने घेतलेल्या पिकातून सुमारे अडीचशे क्विंटल उत्पादन मिळाले. मात्र, बाजारात कांद्याला केवळ तीन ते चार रुपये प्रतिकिलो दर मिळत असल्याने त्यांनी चांगल्या भावाच्या अपेक्षेने कांदा साठवून ठेवला होता. परंतु वाढत्या उष्णतेमुळे साठवलेला कांदा पूर्णपणे सडल्याने त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
विशेष म्हणजे शेतापर्यंत जाण्यासाठी योग्य रस्ता नसल्याने वाहनांची सोय उपलब्ध नाही. त्यामुळे उर्वरित कांदा शेतातच साठवून ठेवावा लागला. याच कांद्याला उष्णतेचा मोठा फटका बसला. सध्या अनेक शेतकऱ्यांच्या वखारीतील आणि शेतात साठवलेल्या कांद्याचीही अशीच अवस्था होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
याबाबत शासनाने तात्काळ पंचनामे करून सडलेल्या कांद्याला नैसर्गिक आपत्तीग्रस्त नुकसान म्हणून मान्यता द्यावी आणि प्रभावित शेतकऱ्यांना अनुदान स्वरूपात आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.
तसेच विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे आणि कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी या गंभीर प्रश्नाकडे लक्ष देऊन शासन स्तरावर पाठपुरावा करावा व कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळवून द्यावा, अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.

COMMENTS