यल्लापूर (कर्नाटक) : उत्तर कन्नड जिल्ह्यातील यल्लापूर तालुक्यातील अरबैल घाट परिसरात गुरुवारी पहाटे झालेल्या भीषण रस्ता अपघातात सात जणांचा जागीच म

यल्लापूर (कर्नाटक) : उत्तर कन्नड जिल्ह्यातील यल्लापूर तालुक्यातील अरबैल घाट परिसरात गुरुवारी पहाटे झालेल्या भीषण रस्ता अपघातात सात जणांचा जागीच मृत्यू झाला, तर तीन जण गंभीर जखमी झाले. दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या वाहनाची मालवाहू ट्रकशी समोरासमोर जोरदार धडक झाल्याने हा भीषण अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत्यूमुखी पडलेले सर्वजण धारवाड येथील रहिवासी होते. बुधवारी रात्री त्यांनी धर्मस्थळासह विविध देवस्थानांच्या दर्शनासाठी प्रवास सुरू केला होता. गुरुवारी पहाटे अरबैल घाट परिसरात त्यांचे प्रवासी वाहन आणि मालवाहू ट्रक यांच्यात भीषण धडक झाली. धडकेचा जोर इतका प्रचंड होता की वाहनाचा अक्षरशः चुराडा झाला. या दुर्घटनेत वाहनातील सात जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये वाहनचालक संजय अंगडी, बसवराज, अभिषेक ईश्वर, अक्षय, अभिषेक आणि मंजूनाथ चुलकी यांचा समावेश आहे. सातव्या मृत व्यक्तीची ओळख अद्याप अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आलेली नाही. या अपघातात दुर्गाप्पा मडिवाळ, चन्नबसय्या संपगाव आणि सचिन हे गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. अपघाताची माहिती मिळताच यल्लापूर पोलीस आणि महामार्ग सुरक्षा पथक घटनास्थळी दाखल झाले. जखमींना त्वरित उपचारासाठी हलविण्यात आले, तर वाहनाचा मोठ्या प्रमाणात चुराडा झाल्यामुळे मृतदेह बाहेर काढण्यासाठी बचाव पथकाला मोठी कसरत करावी लागली. काही काळ या मार्गावरील वाहतुकीवरही परिणाम झाला होता. या प्रकरणी बचावलेल्या शिवराज यांच्या तक्रारीवरून भारतीय न्याय संहितेतील सार्वजनिक रस्त्यावर निष्काळजीपणे वाहन चालविणे, इतरांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण करणे आणि निष्काळजीपणामुळे मृत्यूस कारणीभूत ठरणे या तरतुदींनुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अपघाताचे नेमके कारण काय, ट्रकचालकाची चूक होती की अन्य कोणते कारण याचा सर्वंकष तपास पोलीस करीत आहेत.

COMMENTS