Homeताज्या बातम्या

जामीनदारांच्या सातबाऱ्यावर एक लाखांचा बोजा; अवैध दारू विक्रेत्यांना पाठबळ देणाऱ्यांवर राहुरी पोलिसांची धडक कारवाई

देवळाली प्रवरा : अवैध दारू विक्रीविरोधात राहुरी पोलिसांनी जिल्ह्यात एक आगळीवेगळी आणि धडक मोहीम राबवली आहे. दारूबंदी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या १० अ

सोनईत सुगंधी तंबाखूचा साठा जप्त
पाथर्डी उपजिल्हा रुग्णालयातील कारभाराची चौकशी करा; २२ जून रोजी आंदोलनाचा किशोर हरेर आणि शहानवाज शेख यांचा इशारा
अहिल्यानगर जिल्ह्यात मोठी कारवाई; ‘गर्भलिंग निदान’ प्रकरणी आणखी दोघांना अटक, आरोपींची संख्या २१ वर, ७ डॉक्टरांचा समावेश
हॉटेलमध्ये अवैध दारू विक्री; पुणे ते सोलापूर महामार्गावरील प्रकार

देवळाली प्रवरा : अवैध दारू विक्रीविरोधात राहुरी पोलिसांनी जिल्ह्यात एक आगळीवेगळी आणि धडक मोहीम राबवली आहे. दारूबंदी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या १० अवैध दारू विक्रेत्यांच्या जामीनदारांच्या सातबारा उताऱ्यावर प्रत्येकी एक लाख रुपयांचा बोजा चढविण्याची ऐतिहासिक कारवाई करण्यात आली आहे. या निर्णयामुळे अवैध धंदे करणाऱ्यांसह त्यांना पाठबळ देणाऱ्या जामीनदारांनाही कायद्याचा मोठा फटका बसला आहे.

राहुरी पोलीस ठाण्यात सन २०२५ मध्ये दारूबंदी कायद्यांतर्गत २२१ गुन्हे दाखल करण्यात आले होते. तर सन २०२६ मध्ये जानेवारी ते मे अखेरपर्यंत आणखी १५४ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. मागील दीड वर्षांत एकूण ३७५ गुन्हे दाखल झाल्यानंतर वारंवार अवैध दारू विक्री करणाऱ्या आरोपींविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई सुरू करण्यात आली. तीनपेक्षा अधिक गुन्हे दाखल असलेल्या अवैध दारू विक्रेत्यांविरुद्ध एकूण १५५ प्रस्ताव श्रीरामपूरचे प्रांताधिकारी किरण पाटील यांच्याकडे पाठविण्यात आले होते. त्यापैकी १२१ प्रकरणांमध्ये आरोपींकडून प्रत्येकी एक लाख रुपयांचे बाँड घेण्यात आले. मात्र, बाँड दिल्यानंतरही १० आरोपी पुन्हा अवैध दारू विक्री करताना आढळून आले.

यामुळे राहुरी पोलिसांनी संबंधित आरोपींचे बाँड रद्द करण्याचे प्रस्ताव प्रांताधिकारी कार्यालयाकडे पाठविले. प्रांताधिकाऱ्यांनी अटींचे उल्लंघन केल्याप्रकरणी संबंधित आरोपींना प्रत्येकी एक लाख रुपयांचा दंड ठोठावला. मात्र, दंडाची रक्कम न भरल्याने अखेर संबंधित आरोपींच्या जामीनदारांच्या सातबारा उताऱ्यावर शासन वसुलीचा बोजा चढविण्याचे आदेश २ जून २०२६ रोजी जारी करण्यात आले.

ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ठेंगे यांच्या नेतृत्वात करण्यात आली. पोलिस उपनिरीक्षक गणेश वाघमारे, समाधान फडोळ, राजेंद्र जाधव, पोहवा सूरज गायकवाड, गणेश मैड, सचिन कोळी आणि वृषाली कुसळकर यांनी या कारवाईचा पाठपुरावा केला.

COMMENTS