Homeताज्या बातम्यासंपादकीय

राजकारणातील मूल्ये आणि नैतिकता

गेल्या दोन दशकांपासून सुरू असलेले राजकारण आणि सत्तेत राहण्यासाठी होत असलेल्या तडजोडी बघितल्या की, राजकारणामध्ये मूल्ये आणि नैतिकता असते का? असा स

तापमानवाढीतील बदल
अशोक चव्हाणांचा भाजपप्रवेश
कर्जबुडवे आणि हिंडेनबर्ग अहवाल

गेल्या दोन दशकांपासून सुरू असलेले राजकारण आणि सत्तेत राहण्यासाठी होत असलेल्या तडजोडी बघितल्या की, राजकारणामध्ये मूल्ये आणि नैतिकता असते का? असा सवाल उपस्थित न झाल्यास नवल वाटायला नको. वास्तविक पाहता राजकारणामध्ये अलीकडच्या काही वर्षांपासून अनेक तथाकथित गुंडांना राजकीय पक्ष आश्रय देतांना दिसून येत आहे. त्यामुळे गुन्हेगारांना आश्रय मिळत असल्यामुळे व्हाईट कॉलर नेते सांगतील ते कामे करण्यास गुंड तयार होतांना दिसून येतात. त्यामुळे राजकीय पक्षांची नैतिकता मूल्ये आजमितीस गहाण पडल्याचे दिसून येत आहे. राज्यातील कोणत्याच पक्षाला गुन्हेगारी वर्ज्य नसल्याचे आजमितीस तरी दिसून येत आहे. एकेकाळी आजचे सत्ताधारी विरोधी पक्षात असतांना सत्ताधार्‍यांनी आपल्या पक्षात गुन्हगांराना प्रवेश दिला म्हणून तुटून पडायचे, आणि आज पुन्हा तेच आपल्या पक्षात उजळमाथ्याने गुन्हेगारांना प्रवेश देत असल्याचे दिसून येत आहे. गुन्हेगारीला मोडून काढण्याची भाषा करणारे आज गुंडासोबत दिसत आहे. राजकारणाचे गुन्हेगारीकरण हे काही आता नवे राहिले नाही. प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष गुंडापुंडाचा आधार घेऊन राजकारण करण्याचे दिवस संपलेले नाही ते आजही सुरू आहे. वास्तविक विरोधी पक्षाच्या खुर्चीत बसले की कोणतेही बेछूट आरोप करणे अगदी सोपे असते. मात्र विरोधक जेव्हा खुर्चीवर बसतात तेव्हा त्यांना नक्कीच मर्यादा येतात. काही वर्षांपूर्वी सातार्‍यातील एका सभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत कान्ह्या घोलप या गुंडाने जाहीरपणे प्रवेश केल्याने त्यांनाही टीकेचे धनी व्हावे लागले. त्यांच्याच पक्षातीन नेते संजय राऊत अलीकडच्या काही दिवसांमध्ये सत्ताधार वर्गातील नेत्यांसोबत गुंडाचे फोटो ट्विट करतांना दिसून येत आहे. त्यामुळे सत्ता बदलत जाते, त्याचप्रकारे आपली परिभाषा बदलत जाते, हेच यातून अधोरेखित होते.
राजकारणाचे होणारे गुन्हेगारीकरण हे लोकशाहीसाठी अतिशय घातक आहे. लोकशाहीला आपल्या सोयीसाठी वापर करण्याचे प्रमाण वाढत आहे. राजकीय पक्षांनी तर गुन्हेगारांच्या चारित्र शुद्धीकरणाचा नवा पायंडाच सुरू केला आहे. त्यामुळे कुख्यात म्हणून गणले जाणारे अनेक  गुन्हेगार आता खादीचे पांढरे शुभ्र कपडे परिधान करून समाजात ताठ मानेने वावरत आहेत. कधीकाळी नंग्या तलवारीच्या पातींच्या आधारे पाहिजे ते मिळवणार्‍या अशा कार्यर्कत्यांमुळे राजकारणाचा आखाडा गुन्हेगारीचा आखाडा होऊ लागला आहे. राजकारणात टिकून राहायचे असेल, तर गुन्हेगार हाताशी असलेच पाहिजेत, असा समज राजकीय पक्षांनी करून घेतला आहे की काय असे वाटण्यासारखी परिस्थिती राजकीय वर्तुळात निर्माण झाली आहे. राज्यातील राजकारणाचे मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीकरण सुरू झाले आहे. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून गुंडांना पक्षात घ्यायचे, जेलमधील  गुंडांना पॅरोलवर बाहेर काढायचे आणि वापर झाल्यानंतर त्यांना पुन्हा जेलमध्ये पाठवायचे असे पूर्वीचे धोरण पुन्हा एकदा राज्यात सक्रिय झाले आहे. सत्ता ही सर्वसामान्यांसाठी न वापरता सत्तेला टिकविण्यासाठी सर्वच मार्गाचा वापर विद्यमान सत्ताधार्‍याकडून करण्यात येत आहे. एकंदरित राजकीय पक्षांचा बदललेला दृष्टिकोन पहिला, तर राजकारणात कोणीही धुतल्या तांदळासारखे स्वच्छ नसतो, हे प्रत्येकाने कृतीतून दाखवून दिले आहे. गुन्हेगारांच्या या विळख्यातून राजकीय पक्षांची सुटका होईल का, हा यक्षप्रश्‍न् आहे. राजकारणात गुन्हेगारी वाढत चालली असून, त्याला कुठेतरी पायबंद घालण्याची गरज आहे. मुख्यत: राजकीय व्यक्तीवर असणारे गुन्हे कधी उजेडात येत नाही, आले तरी, शिक्षा होण्याचे प्रमाण नगण्य आहे. कारण गुन्हा जरी दाखल झाला, तरी पुरावे गोळा होत नाही.  त्यामुळे अशा राजकीय व्यक्तींना निर्दोष सोडण्यात येते. तर गुन्हा दाखल झाल्यानंतर ही असे राजकारणी निवडणूका लढवून लोकप्रतिनिधी बनतात. किंवा राजकीय पक्ष त्यांना राजाश्रय देतात, आणि ते त्यांचे बस्तान बसवतांना दिसून येतात. मात्र याला आवर घालण्याची गरज आहे.

COMMENTS