Homeताज्या बातम्या

समतेचा जागर करत राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन

कोल्हापूर : सामाजिक न्यायाचे प्रणेते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या 152 व्या जयंतीनिमित्त कोल्हापूरमध्ये विविध कार्यक्रम उत्साहात पार पडले.

कोपरापासून हात नाहीत..! दहावीत पटकावला तिसरा क्रमांक  
कुंडलवाडीत मोकाट कुत्रे व डुकरांचा वाढता उपद्रव ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
गोकुंदा येथील सरतापे कुटुंबाची ’यशाची हॅट्ट्रिक’; सुमेध, श्वेता आणि अंकिताची गरुडझेप!


कोल्हापूर : सामाजिक न्यायाचे प्रणेते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या 152 व्या जयंतीनिमित्त कोल्हापूरमध्ये विविध कार्यक्रम उत्साहात पार पडले. जिल्हा प्रशासन आणि समाजकल्याण विभागाच्या वतीने दसरा चौक येथे समता दिंडीसह अनेक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून समता दिंडीला प्रारंभ झाला.
कसबा बावडा येथील राजर्षी शाहू महाराजांच्या जन्मस्थळी आयोजित कार्यक्रमात वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी अभिवादन करताना शाहू महाराजांचा लोककल्याणाचा वारसा आजही समाजाला प्रेरणा देत असल्याचे सांगितले. त्यांच्या विचारांचे आणि कृतीचे आचरण केल्यास समाजजीवन अधिक समृद्ध होईल, असे त्यांनी नमूद केले. या प्रसंगी पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार सतेज पाटील, आमदार अमल महाडिक, महापौर रूपाराणी निकम, जिल्हाधिकारी विजय राठोड, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी हसरत जास्मिन, विजयराव देवणे, वसंतराव मुळीक, राजेश लाटकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. ‘लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज की जय’च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. दसरा चौकातून निघालेल्या समता दिंडीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. पालकमंत्री आबिटकर यांच्यासह विविध मान्यवरांनी पालखीला खांदा देत सामाजिक समतेचा संदेश दृढ केला. खासदार शाहू छत्रपती महाराज, आमदार जयंत आसगावकर, महापालिका आयुक्त राजेंद्र भारुड आणि अन्य अधिकारीही या वेळी उपस्थित होते. प्रारंभी सर्वांनी शाहू महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
दरवर्षी 26 जून हा दिवस ‘सामाजिक न्याय दिन’ म्हणून साजरा केला जातो. आपल्या कारकिर्दीत राजर्षी शाहू महाराजांनी मागासवर्गीय, दिव्यांग, वृद्ध, निराधार आणि वंचित घटकांच्या उन्नतीसाठी अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले. त्यांच्या कार्यातून समता, शिक्षण आणि सामाजिक न्यायाची मूल्ये समाजात रुजली. समता दिंडीने व्हीनस कॉर्नर, माईसाहेब स्मारक, बिंदू चौक येथे महात्मा ज्योतिराव फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना अभिवादन केले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौक, महानगरपालिका परिसर, गंगाराम कांबळे स्मारक आदी ठिकाणी अभिवादन करून दिंडीची सांगता दसरा चौक मैदानात झाली. दिंडीत जिल्ह्यातील शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थी, सामाजिक न्याय विभागाचे अधिकारी व कर्मचारी, शासकीय वसतिगृहांतील विद्यार्थी, आश्रमशाळांचे प्रतिनिधी, विविध सामाजिक संस्था आणि हजारो नागरिक सहभागी झाले. पारंपरिक वेशभूषा, ढोल-ताशे, लेझीम, हलगीवादन आणि राजर्षी शाहू महाराजांच्या जीवनकार्यावर आधारित चित्ररथ हे विशेष आकर्षण ठरले. महामानवांच्या साहित्याने सजविलेली ग्रंथपालखीही नागरिकांचे लक्ष वेधून घेत होती. शासकीय व निमशासकीय विभाग, तृतीयपंथी नागरिक, ज्येष्ठ नागरिक, महिला, पोलीस अधिकारी व कर्मचारी, सेवानिवृत्त कर्मचारी, वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील प्रतिनिधी, वाहतूक शाखा, स्वच्छता विभाग, पत्रकार, राष्ट्रीय सेवा योजना आणि राष्ट्रीय छात्र सेनेचे स्वयंसेवक, विविध तालमी, तरुण मंडळे आणि बचतगट यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून राजर्षी शाहू महाराजांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

COMMENTS