बीड : संत भगवान बाबा, संत वामनभाऊ यांसारखे थोर ‘हिरे’ संत महाराष्ट्राला देण्याचे कार्य संत बंकटस्वामी महाराजांनी केले. समाजातील रुढींना योग्य वळण

बीड : संत भगवान बाबा, संत वामनभाऊ यांसारखे थोर ‘हिरे’ संत महाराष्ट्राला देण्याचे कार्य संत बंकटस्वामी महाराजांनी केले. समाजातील रुढींना योग्य वळण देणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे युगपुरुष असतात आणि बंकटस्वामी महाराज हे खरे युगपुरुष होते, असे प्रतिपादन ह.भ.प. उमेश महाराज दशरथे यांनी केले.
ते बीड जिल्ह्यातील श्रीक्षेत्र नेकनूर येथे आयोजित संत बंकटस्वामी महाराजांच्या 82 व्या पुण्यतिथी उत्सवातील सहाव्या दिवसाच्या कीर्तनप्रसंगी बोलत होते. यावेळी ह.भ.प. महंत लक्ष्मण महाराज मेंगडे यांच्यासह हजारो भाविकांची उपस्थिती होती. या प्रसंगी शांतीब्रह्म महादेव महाराज तात्या चाकरवाडीकर, शामसुंदर महाराज सोन्नर, पवार महाराज, सुधाकर महाराज शिंदे, मारुती महाराज चोरमले, विष्णूदास महाराज सुरवसे, दत्ता महाराज येवले, नाना महाराज कदम, सत्यवान महाराज लाटे, सुरेश महाराज जाधव, अच्युत महाराज घोडके, गणेश महाराज बांडे आदींसह अनेक वारकरी संत उपस्थित होते. उमेश महाराज दशरथे यांनी आपल्या कीर्तनातून संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या अभंगावर आधारित चिंतन मांडले. उजळावया आलो वाटा, खरा खोटा निवाडा… या अभंगाच्या माध्यमातून त्यांनी भक्ती, श्रद्धा आणि आत्मपरीक्षण यांचे महत्त्व स्पष्ट केले. वारकरी संप्रदायात बंकटस्वामी महाराजांचे योगदान अत्यंत मोलाचे असून जोग महाराज यांच्या शिष्य परंपरेत वारकरी शिक्षण संस्थेला स्थैर्य देण्याचे कार्य त्यांनी केले. आज या संस्थेचा मजबूत पाया उभा आहे, त्यामागे बंकटस्वामी महाराजांचे मोठे योगदान असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच, काकडा भजनाची पद्धत, गौळणीचा समावेश, अभंगांच्या भावानुसार चाली बसविणे आणि त्या माध्यमातून ज्ञानेश्वर-तुकारामांच्या विचारांना लोकांच्या अंतःकरणापर्यंत पोहोचवणे हे कार्य स्वामींनी प्रभावीपणे केले, असेही त्यांनी सांगितले. रुढींना योग्य दिशा देणारे युगपुरुष असतात. कीर्तन, भजन, मृदंग वादन आणि वारकरी परंपरेला योग्य वळण देण्याचे श्रेय बंकटस्वामी महाराजांनाच जाते, असे ते पुढे म्हणाले. मराठवाड्यात वारकरी संप्रदायाची क्रांती घडवून आणणारे संत वामनभाऊ, भगवान बाबा, शंकर बापू आपेगावकर यांसारखे अनेक संत महाराष्ट्राला देण्यामागेही बंकटस्वामी महाराजांचे मोठे योगदान असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. कीर्तनास गायनाची साथ प्रसिद्ध गायनाचार्य दत्ता महाराज साळुंखे, सतीश महाराज जाधव यांनी दिली, तर मृदंग साथ अनिकेत महाराज लांडे, प्रदीप महाराज बोराडे, दत्ता महाराज येवले यांनी केली. यावेळी बंकटस्वामी महाराज फडवरील गायक-वादक मंडळींसह हजारो भाविक उपस्थित होते. उमेश महाराज दशरथे यांनी संत बंकटस्वामी महाराजांच्या काकड्याच्या पारंपरिक चाली अत्यंत सुरेल आणि भावपूर्ण पद्धतीने सादर केल्या. त्यामुळे संपूर्ण कीर्तन मंडप भक्तीरसात न्हाऊन निघाला होता.

COMMENTS