औरंगपूर (ता. केज, जि. बीड) : आषाढी वारी 2026 निमित्त श्री जगद्गुरू तुकोबाराय पावनधाम, औरंगपूर येथून पालवनधाम दिंडीचे रविवारी रोजी भक्तिमय वातावरण

औरंगपूर (ता. केज, जि. बीड) : आषाढी वारी 2026 निमित्त श्री जगद्गुरू तुकोबाराय पावनधाम, औरंगपूर येथून पालवनधाम दिंडीचे रविवारी रोजी भक्तिमय वातावरणात उत्साहात प्रस्थान झाले. विठ्ठलनामाच्या अखंड गजरात आणि टाळ-मृदंगाच्या निनादात शेकडो वारकरी श्री क्षेत्र देहूकडे मार्गस्थ झाले.
दिंडी प्रस्थानापूर्वी संत तुकाराम महाराज यांच्या मूर्तीचा दुग्धाभिषेक ह.भ.प. महंत महादेव महाराज बोराडे (शास्त्री) यांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर हरिनाम भजन, कीर्तन व सामूहिक नामस्मरणाने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. ज्ञानोबा-तुकोबा आणि पुंडलिक वरदा हरी विठ्ठल या जयघोषाने पावनधाम परिसर दुमदुमून गेला. या दिंडीत औरंगपूरसह बनसारोळा, आवसगाव, कौडगाव, जवळबन, दाभा, कळंबआंबा, लाडेगाव, जयपूर, दिपेवडगाव, सोनवळा, कुंभेफळ, बोरीसावरगाव, होळ, सोमनाथ बोरगाव, चनई, सुरडी, सोनेसांगवी, आवाड, शिरपूरा, अंकोली, सौंदना (आंबा), सौंदना (केज), सावळेश्वर, मोटेगाव, गोटेगाव, इस्थळ, वाकडी, सुकळी, गांजी, चंदनसावरगाव, भावठाणा, बुधोडा, पिंपरीआंबा, गाधवड, वांजरखेडा, फावडेवाडी, पैठण (सा.), तांदळवाडी, गगनबीड, वळगा, वाघोली, लोखंडी सावरगाव, माळेगाव आदी गावांतील वारकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले. वारकर्यांसाठी वाहन व्यवस्था, भोजन, पिण्याचे स्वच्छ पाणी, वैद्यकीय सेवा तसेच इतर आवश्यक सुविधांची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. संपूर्ण सोहळा शिस्तबद्ध आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. ह.भ.प.महंत महादेव महाराज बोराडे (शास्त्री) यांच्या मार्गदर्शनाखाली निघालेली ही दिंडी श्रीक्षेत्र देहू येथे संतश्रेष्ठ तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यात सहभागी होणार असून, त्यानंतर श्रीक्षेत्र पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी प्रस्थान करणार आहे. भक्ती, सेवा, समता आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देणार्या या दिंडी सोहळ्याबद्दल वारकरी व भाविकांमध्ये मोठा उत्साह दिसून आला.

COMMENTS