Homeताज्या बातम्या

महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोरच रस्ता खचला; कार थेट खड्ड्यात, प्राध्यापक एंगडे थोडक्यात बचावले!

नांदेड: शहरातील रस्त्यांच्या निकृष्ट दर्जाच्या कामांचा आणि पावसाळ्यातील धोकादायक परिस्थितीचा प्रत्यय गुरुवारी दुपारी नेताजी सुभाषचंद्र महाविद्य

गजानन विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा; योगासनांद्वारे निरोगी आयुष्याचा दिला संदेश
नांदेडमध्ये ‘जवाब दो महामोर्चा’; विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक
“प्रश्न विचारला की महाराष्ट्राचा अपमान..”; विद्यार्थ्यांच्या आंदोलनासाठी मराठी कलाकारांनी उठवला आवाज

नांदेड: शहरातील रस्त्यांच्या निकृष्ट दर्जाच्या कामांचा आणि पावसाळ्यातील धोकादायक परिस्थितीचा प्रत्यय गुरुवारी दुपारी नेताजी सुभाषचंद्र महाविद्यालयासमोर आला. महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरील रस्ता अचानक खचल्याने एका प्राध्यापकांची कार थेट मोठ्या खड्ड्यात कोसळली. या थरारक घटनेत महाविद्यालयातील प्राध्यापक चंद्रशेखर एंगडे हे सुदैवाने थोडक्यात बचावले असून मोठा अनर्थ टळला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रा. चंद्रशेखर एंगडे हे गुरुवारी दुपारी महाविद्यालयातील नियमित कामकाज आटोपून आपल्या चारचाकी वाहनाने घरी जाण्यासाठी निघाले होते. महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारातून कार बाहेर काढत असताना अचानक रस्त्याखालचा भाग खचला. क्षणातच कारचा पुढील भाग मोठ्या खड्ड्यात घसरला आणि वाहन अडकून पडले. घटना इतक्या वेगाने घडली की परिसरातील विद्यार्थी, प्राध्यापक आणि कर्मचारी काही काळ स्तब्ध झाले. मोठा आवाज झाल्याने उपस्थितांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिक आणि महाविद्यालयातील कर्मचार्‍यांच्या मदतीने प्राध्यापकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे.

या घटनेमुळे महाविद्यालय परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. प्रवेशद्वारासमोरच रस्ता खचल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबतही गंभीर चिंता व्यक्त करण्यात येत आहे. दररोज शेकडो विद्यार्थी, पालक आणि नागरिक या मार्गाचा वापर करतात, त्यामुळे याच ठिकाणी एखादा दुचाकीस्वार, पादचारी किंवा विद्यार्थ्यांचा समूह असता तर मोठी दुर्घटना घडली असती, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली.

दरम्यान, सलग पडणार्‍या पावसामुळे शहरातील अनेक रस्त्यांची दुरवस्था उघड झाली आहे. भूमिगत गटार, पाणीपुरवठा किंवा इतर विकासकामांनंतर योग्य प्रकारे भराव न टाकल्याने रस्ते आतून पोकळ होऊन अशा घटना घडत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. महाविद्यालयासारख्या महत्त्वाच्या ठिकाणी रस्ता अचानक खचणे ही गंभीर बाब असल्याने सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महापालिका प्रशासनाने तातडीने या घटनेची चौकशी करून रस्त्याची गुणवत्ता तपासावी, दोषींवर कारवाई करावी आणि धोकादायक ठिकाणांची तत्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिक व पालकांकडून होत आहे.

COMMENTS