Homeताज्या बातम्या

लोकमंथनच्या वृत्ताचा प्रशासनाला धक्का; सेतू केंद्र चालकांना तहसीलदारांचा कडक इशारा

देगलूर: सेतू सुविधा केंद्रांमधील अतिरिक्त शुल्क आकारणी, शेतकरी व नागरिकांची होत असलेली आर्थिक पिळवणूक आणि शासनाच्या नियमांचे होत असलेले उल्

शेळ्या चोरी करणारी कुख्यात टोळी बीड एलसीबी पथकाकडून जेरबंद; स्विफ्ट कारसह ४ लाख ८५ हजारांचा मुद्देमाल जप्त
धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा; विद्यार्थी एकजुटीचा विजय: राजेंद्र आमटे
बालदिंडीने वांबोरी स्टेशन परिसर भक्तिमय; जिल्हा परिषद शाळेचा उपक्रम उत्साहात संपन्न

देगलूर: सेतू सुविधा केंद्रांमधील अतिरिक्त शुल्क आकारणी, शेतकरी व नागरिकांची होत असलेली आर्थिक पिळवणूक आणि शासनाच्या नियमांचे होत असलेले उल्लंघन याबाबत लोकमंथनने प्रसिद्ध केलेल्या वृत्ताची महसूल प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. या वृत्तानंतर देगलूरच्या तहसीलदारांनी तातडीने तालुक्यातील सर्व सेतू सुविधा केंद्र चालकांची बैठक बोलावून त्यांना कडक शब्दांत इशारा दिला आहे.

बैठकीत महाराष्ट्र शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत शेतकर्‍यांकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारू नये, सर्व प्रक्रिया पूर्णपणे निःशुल्क पार पाडाव्यात, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले. तसेच नागरी सेवा लॉगिनद्वारे नागरिकांना देण्यात येणार्‍या सेवांसाठी शासनाने निश्चित केलेल्या शुल्काव्यतिरिक्त अतिरिक्त रक्कम आकारल्यास संबंधित सेतू सुविधा केंद्राचे लॉगिन रद्द करण्यासह कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा कडक इशारा तहसीलदारांनी दिला.

याशिवाय मंजूर केलेल्या ठिकाणीच सेवा केंद्र सुरू ठेवणे, अर्जांसोबत आवश्यक मानक कागदपत्रे जोडणे, घोषणापत्रे त्रुटीरहित सादर करणे आणि शासनाच्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक असल्याचेही बैठकीत ठणकावून सांगण्यात आले.

या बैठकीस नायब तहसीलदार गणेश रायेवार, सहाय्यक महसूल अधिकारी सचिन कोनेरी तसेच तालुक्यातील सर्व सेतू सुविधा केंद्र चालक उपस्थित होते. लोकमंथनने जनतेच्या प्रश्नांवर उपस्थित केलेल्या मुद्द्यांनंतर प्रशासनाने तातडीने बैठक घेऊन कडक सूचना जारी केल्याने, लोकमंथनच्या वृत्ताच्या प्रभावी प्रभावाची जोरदार चर्चा संपूर्ण तालुक्यात सुरू आहे.

COMMENTS