माहूर: साडेतीन शक्तिपीठांपैकी मूळपीठ म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्रीक्षेत्र माहूरगडावर गुरुपौर्णिमेनिमित्त भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचे अनोखे दर्शन

माहूर: साडेतीन शक्तिपीठांपैकी मूळपीठ म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्रीक्षेत्र माहूरगडावर गुरुपौर्णिमेनिमित्त भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचे अनोखे दर्शन घडले. आदिशक्ती श्री रेणुका मातेला केळीच्या फळांची आकर्षक व नेत्रदीपक आरास करण्यात आली असून, तिचे मनोहारी रूप पाहण्यासाठी देशभरातून आलेल्या लाखो भाविकांनी मोठी गर्दी केली. ‘जय रेणुका माता’च्या जयघोषाने संपूर्ण माहूरगड परिसर भक्तिमय वातावरणात दुमदुमून गेला.
गुरुपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर विश्वस्त तथा पुजारी चंद्रकांत भोपी आणि पुजारी शुभम भोपी यांच्या हस्ते श्री रेणुका मातेला पंचामृत अभिषेक करण्यात आला. त्यानंतर देवीला महावस्त्र परिधान करून पारंपरिक अलंकारांनी सजविण्यात आले. पुरणपोळीचा महानैवेद्य अर्पण करून महाआरती करण्यात आली. या धार्मिक विधीप्रसंगी विश्वस्त तथा पुजारी विनायक फांदाडे, संजय कान्नव, बालाजी जगत, आशिष जोशी, दुर्गादास भोपी आदी मान्यवर उपस्थित होते.
गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने नवचंडी पाठाचे पठण करण्यात आले. मंदिरासमोरील पारंपरिक यज्ञकुंडात विधिवत होम-हवन संपन्न झाले. मुख्य गाभार्यात देवीसमोर केळीच्या फळांची आकर्षक आरास करण्यात आली होती. देवीचे तेजस्वी रूप आणि समोरची सुंदर फळांची सजावट पाहून भाविक भारावून गेले. दिवसभर भाविकांनी दर्शनासाठी मोठी रांग लावली होती.
यावेळी परशुराम मंदिरात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. दर्शनासाठी आलेल्या हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला, तसेच प्रत्येक भाविकाला प्रसाद म्हणून केळीचे फळ देण्यात आले.
गर्दी लक्षात घेऊन मंदिर प्रशासनाने चोख नियोजन केले होते. दर्शनरांगेची विशेष व्यवस्था, शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा, महाप्रसाद, सुरक्षा कर्मचारी, सीसीटीव्ही कॅमेर्यांद्वारे देखरेख आणि रुग्णवाहिका सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती मंदिराचे व्यवस्थापक विजय राऊत यांनी दिली.
या सोहळ्याचे पौरोहित्य वे.शा.सं. रविंद्र कान्नव आणि मनोज बनसोडे यांनी केले. यावेळी पुजारी अनिल कान्नव, वल्लभ आमले, प्रसाद कान्नव, सागर देव, राजेश कान्नव, मंगेश रीठे, गणेश संतान यांच्यासह ब्रह्मवृंद, पुजारी आणि हजारो भाविक उपस्थित होते.

COMMENTS