बीड : महाराष्ट्रातील शिक्षक भरती प्रक्रियेसाठी पवित्र पोर्टलवर पात्र उमेदवारांकडून विविध पदांसाठी पसंतीक्रम भरणे व तो निश्चित करण्याची प्रक्रिया
बीड : महाराष्ट्रातील शिक्षक भरती प्रक्रियेसाठी पवित्र पोर्टलवर पात्र उमेदवारांकडून विविध पदांसाठी पसंतीक्रम भरणे व तो निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पोर्टलवर वारंवार तांत्रिक अडचणी निर्माण होत असल्याने अनेक उमेदवारांना लॉगिन करणे, उपलब्ध पदांची माहिती पाहणे, पसंतीक्रम भरणे तसेच तो लॉक करणे यामध्ये अडथळे येत आहेत. त्यामुळे तांत्रिक कारणांमुळे पात्र उमेदवार भरतीच्या संधीपासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली आहे.
या पार्श्वभूमीवर ब्राईट सोशल फाउंडेशन, बीड यांच्या वतीने शिक्षण आयुक्तांकडे निवेदन देण्यात आले असून, पसंतीक्रम भरणे व लॉक करण्यासाठी किमान तीन ते सात दिवसांची मुदतवाढ देण्याची मागणी करण्यात आली आहे. पोर्टलवरील तांत्रिक अडचणी उमेदवारांच्या नियंत्रणाबाहेरील असल्याने त्याचा फटका कोणत्याही पात्र उमेदवाराला बसू नये, अशी भूमिका फाउंडेशनने घेतली आहे.
सर्व पात्र उमेदवारांना समान संधी मिळावी यासाठी मुदतवाढीचा निर्णय अधिकृतरीत्या जाहीर करावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. तसेच पवित्र पोर्टलवरील तांत्रिक त्रुटी तातडीने दूर करून सुरळीत लॉगिन, पसंतीक्रम भरणे आणि लॉक करण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
तांत्रिक अडचणींमुळे पसंतीक्रम लॉक करता न आलेल्या उमेदवारांना विशेष संधी द्यावी. यासोबतच मुदतवाढीबाबतची अधिकृत सूचना पवित्र पोर्टल तसेच संबंधित विभागाच्या माध्यमातून प्रसिद्ध करावी, अशाही मागण्या करण्यात आल्या आहेत. शिक्षक भरती प्रक्रियेत राज्यातील सर्व पात्र उमेदवारांना समान व न्याय्य संधी मिळावी, हा या मागणीमागील उद्देश असल्याचे ब्राईट सोशल फाउंडेशनने स्पष्ट केले आहे.

COMMENTS