कोपरगाव : मतदारसंघातील वीज ग्राहकांच्या समस्या वेळेत सुटत नसल्याने सर्वसामान्य नागरिक, छोटे-मोठे व्यावसायिक तसेच शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. य

कोपरगाव : मतदारसंघातील वीज ग्राहकांच्या समस्या वेळेत सुटत नसल्याने सर्वसामान्य नागरिक, छोटे-मोठे व्यावसायिक तसेच शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. याला महावितरणमधील काही कामचुकार कर्मचारी व अधिकारी जबाबदार असून, यापुढे वीज ग्राहकांच्या समस्या तातडीने सोडविण्याची दक्षता घ्यावी आणि कामात टाळाटाळ करणाऱ्या कर्मचारी व अधिकाऱ्यांना पाठीशी घालू नये, अशा स्पष्ट सूचना आमदार आशुतोष काळे यांनी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्या.
आमदार आशुतोष काळे यांनी सोमवारी (दि. २५) मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या उपस्थितीत महावितरण अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी शेतकऱ्यांनी विविध अडचणी मांडल्यानंतर ते बोलत होते.
ते म्हणाले, “शुक्रवारी (दि. २२) झालेल्या वादळी वाऱ्यामुळे कोपरगाव तालुक्यासह संपूर्ण मतदारसंघाला मोठा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी झाडे वीज वाहिन्यांवर पडल्याने वीज खांब वाकले असून वाहिन्या तुटल्या आहेत. मात्र, तीन दिवस उलटूनही काही गावांमध्ये तुटलेल्या वाहिन्या जोडण्याचे व वीज खांब सरळ करण्याचे काम पूर्ण झालेले नाही. ही कामे तातडीने पूर्ण करावीत.”
शेतकऱ्यांना शेतीपंपासाठी सुरळीत वीजपुरवठा करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. रोहित्र (डीपी) बसविणे व जोडणी करणे, नवीन वीज वाहिनी टाकणे, लघुदाब वाहिनी जोडणे तसेच वीज वाहिन्यांच्या संपर्कातील झाडांची छाटणी ही कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी गरज पडल्यास देखभाल दुरुस्ती करणाऱ्या ठेकेदारांकडील मजुरांची संख्या वाढवावी, असेही त्यांनी सांगितले. चांदेकसारे येथे उभारण्यात येणाऱ्या वीज उपकेंद्राचे काम तातडीने सुरू करून शेतकऱ्यांना उच्च दाबाने वीजपुरवठा करण्यासाठी ते लवकर पूर्ण करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
या बैठकीस कोपरगाव ग्रामीण उपकार्यकारी अभियंता, राहाता ग्रामीण उपकार्यकारी अभियंता, विविध विभागीय अभियंते, गावांचे सरपंच तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS