बीड : अल्पसंख्याक संरक्षण कायद्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनात पूर्णवेळ सहभाग घेण्यासाठी लोकसेना संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीना

बीड : अल्पसंख्याक संरक्षण कायद्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनात पूर्णवेळ सहभाग घेण्यासाठी लोकसेना संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा ड. प्रा. इलियास इनामदार यांनी केली आहे. समाजाला संरक्षण मिळेपर्यंत लोकशाही आणि संविधानिक मार्गाने संघर्ष सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. तसेच यापुढे कोणतीही निवडणूक लढविणार नाही, कोणत्याही राजकीय अथवा सामाजिक संघटनेचे पद स्वीकारणार नाही आणि कोणत्याही लाभाच्या पदावर कार्य करणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात इनामदार यांनी म्हटले आहे की, गेल्या 25 वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत असताना शिक्षण, आरक्षण आणि संरक्षण यांसारख्या महत्त्वाच्या प्रश्नांवर हजारो-लाखोंच्या संख्येने मोर्चे आणि आंदोलने उभारली. मात्र या आंदोलनांचे कधीही राजकीय भांडवल केले नाही. कोणत्याही राजकीय पक्षाकडे निवडणूक तिकीट, पद किंवा अन्य लाभांची अपेक्षा ठेवली नसल्याचेही त्यांनी नमूद केले. मौलाना मुफ्ती आरेफ साहेब आणि उलेमा-ए-इकराम यांच्या उपस्थितीत समाजाला एकजूट करण्याचा तसेच संविधानिक आणि लोकशाही मार्गाने संरक्षणासाठी व्यापक लढा उभारण्याचा संकल्प करण्यात आला असल्याचे इनामदार यांनी सांगितले. त्याच ध्येयाने सध्या विविध स्तरांवर जनजागृती आणि संघटनात्मक काम सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. देश आणि राज्यात अल्पसंख्याक समाजावर अन्याय, अत्याचार, जातीय दंगली, मॉब लिंचिंग, द्वेषपूर्ण भाषणे, धार्मिक स्थळांची विटंबना, सामाजिक बहिष्कार तसेच सोशल मीडियावरील आक्षेपार्ह वक्तव्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचा आरोप त्यांनी केला. या पार्श्वभूमीवर मुस्लिम, बौद्ध, ख्रिश्चन, जैन, पारशी आणि शीख समाजाच्या संरक्षणासाठी ‘अल्पसंख्याक संरक्षण संघर्ष समिती’ची स्थापना करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. ही समिती संविधानिक आणि लोकशाही मार्गाने शासनाकडे स्वतंत्र अल्पसंख्याक संरक्षण कायदा करण्याची मागणी करत असून, त्यासाठी विविध आंदोलनांचे आयोजन करण्यात येत आहे. समितीमध्ये आपण एक सामान्य सदस्य आणि निमंत्रक म्हणून कार्यरत असल्याचेही इनामदार यांनी स्पष्ट केले. दरम्यान, राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 22 जूनपासून सुरू होत असून, त्यामध्ये अल्पसंख्याक संरक्षण कायद्याचा मुद्दा उपस्थित करण्यासाठी राज्यातील सर्व आमदारांना निवेदने देण्यात आली आहेत. तसेच 22 जूनपासून मुंबईतील आझाद मैदान येथे अल्पसंख्याक संरक्षण संघर्ष समितीच्या वतीने लाक्षणिक उपोषण करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. समाजासाठी केलेला त्याग, संघर्ष आणि बलिदान लक्षात घेऊन नागरिकांनी या आंदोलनात निस्वार्थपणे सहभागी व्हावे आणि समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी एकजूट दाखवावी, असे आवाहन अॅड. प्रा. इलियास इनामदार यांनी केले आहे. त्यांच्या राजीनाम्यामुळे आणि आंदोलनातील सक्रिय भूमिकेमुळे अल्पसंख्याक संरक्षण कायद्याच्या मागणीला नवे बळ मिळण्याची चर्चा सामाजिक वर्तुळात सुरू झाली आहे.

COMMENTS