महाराष्ट्र-तेलंगणा सीमावर्ती भागाचा गैरफायदा घेऊन किनवट शहर व संपूर्ण तालुक्यात अनधिकृतपणे समांतर वाहतूक व्यवस्था चालवणार्या तेलंगणा पासिंगच्या

महाराष्ट्र-तेलंगणा सीमावर्ती भागाचा गैरफायदा घेऊन किनवट शहर व संपूर्ण तालुक्यात अनधिकृतपणे समांतर वाहतूक व्यवस्था चालवणार्या तेलंगणा पासिंगच्या ऑटो चालकांवर नवनियुक्त उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रशेखर कदम यांनी पदभार स्वीकारताच तीव्र कायदेशीर बडगा उगारला आहे. गुरुवारी शहरात राबवलेल्या अचानक नाकाबंदी व तपासणी मोहिमेत पोलिसांनी 8 अवैध ऑटो जप्त करत मोटार वाहन कायदा, 1988 अंतर्गत 1 लाख 15 हजार रुपयांचा मोठा दंड (चलन) ठोठावला आहे. या धडक कारवाईमुळे अवैध वाहतूक विश्वात प्रचंड खळबळ उडली आहे.
प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे की, किनवट शहरात धावणार्या वाहनांपैकी तब्बल 90 टक्के ऑटो हे शेजारच्या तेलंगणा राज्यातील नोंदणीकृत आहेत. या वाहनांकडे महाराष्ट्रात व्यावसायिक प्रवासी वाहतूक करण्यासाठी आवश्यक असणारे खालील वैध दस्तऐवज उपलब्ध नव्हते: कलम 66 आंतरराज्यीय किंवा स्थानिक प्रवासी वाहतुकीसाठी आवश्यक असलेला वैध परवाना नसणे, कलम 192 प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या नियमांचे सरळ-सरळ उल्लंघन करून विनानोंदणी किंवा विनापरवाना वाहन चालवणे, इतर त्रुटी: बहुतांश वाहनांकडे वैध विमा आणि फिटनेस प्रमाणपत्र देखील नव्हते. पोलिसांनी केवळ दंड न आकारता, या वाहनांचे परवाने कायमचे रद्द करण्याची कठोर प्रशासकीय प्रक्रिया सक्षम प्राधिकरणाकडे सुरू केली आहे. स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी उपलब्ध नसल्याचा गैरफायदा काही दलाल आणि मध्यस्थांनी घेतला आहे. तेलंगणा राज्यातील स्क्रॅप किंवा चोरीचे व बाद झालेले ऑटो रिक्षा केवळ 50 हजार ते 1 लाख च्या नाममात्र किमतीत आणले जातात. हे व्यवहार प्रादेशिक परिवहन कार्यालयात अधिकृतपणे हस्तांतरित न करता, केवळ 100 रुपयांच्या मुद्रांकावर खरेदी-खताच्या आधारे बेकायदेशीरपणे स्थानिक युवकांना विकले जातात. या अनधिकृत मालकी हक्कामुळे अपघाताच्या वेळी गंभीर कायदेशीर पेच निर्माण होतो. हे विनापरवाना ऑटो चालक रस्त्यांवर वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी कोंबून भरतात. तसेच सीमावर्ती रस्त्यांवर अत्यंत बेजबाबदार व वेगाने वाहने चालवून प्रवाशांच्या मानवी जीवितास थेट धोका निर्माण करत होते. काही ऑटो चालकांचा वापर स्थानिक पातळीवर इतर छुप्या बेकायदेशीर व विघातक कृत्यांसाठीही केला जात असल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. वैध कागदपत्रे, परवाना किंवा विमा नसलेल्या परप्रांतीय अनधिकृत वाहनांमधून नागरिकांनी प्रवास करू नये. कोणत्याही दुर्दैवी अपघाताच्या प्रसंगी अशा वाहनांमधील प्रवाशांना कायदेशीर नुकसानभरपाई किंवा विम्याचा दावा मिळणे कायद्यानुसार अत्यंत कठीण होते. सार्वजनिक सुव्यवस्था व प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ही ’ऑपरेशन क्लीन’ मोहीम अशीच सुरू राहील आणि तालुक्यातील अवैध वाहतूक 100 टक्के बंद केली जाईल.
-चंद्रशेखर कदम, उपविभागीय पोलीस अधिकारी, किनवट.
अनेक वर्षांपासून स्थानिक पोलीस आणि परिवहन प्रशासनातील काही घटकांच्या कथित छुप्या पाठिंब्यामुळे (भ्रष्ट शुक्राचार्यांमुळे) हा अवैध व्यवसाय राजरोसपणे सुरू होता, ज्यामुळे स्थानिक नागरिकांचा जीव धोक्यात आला होता. परंतु, नवनियुक्त एसडीपीओ चंद्रशेखर कदम यांच्या या ’सिंघम’ स्टाईल आणि पारदर्शक ’ऑन द स्पॉट’ कारवाईमुळे किनवटमधील सर्वसामान्य नागरिक, प्रामाणिक व्यावसायिक आणि प्रवाशांमधून पोलीस प्रशासनाचे जोरदार स्वागत व कौतुक केले जात आहे.

COMMENTS