कोपरगाव : छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियानांतर्गत शिंदे सेतू कार्यालय, कोपरगाव यांच्या वतीने भागचंद ठोळे इंग्लिश मीडियम स्कूल येथे

कोपरगाव : छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियानांतर्गत शिंदे सेतू कार्यालय, कोपरगाव यांच्या वतीने भागचंद ठोळे इंग्लिश मीडियम स्कूल येथे विद्यार्थ्यांना रहिवासी दाखल्यांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना आवश्यक शासकीय कागदपत्रे सुलभरीत्या उपलब्ध झाली.
कार्यक्रमास कोपरगावचे नायब तहसीलदार चंद्रकांत कुलथे व शिक्षणाधिकारी शबाना शेख प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच स्कूल कमिटीचे सहसचिव सचिन अजमेरे, डॉ. अमोल अजमेरे, राजेश ठोळे यांच्यासह पालकांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजनाने झाली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना रहिवासी दाखल्यांचे वितरण करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी मार्गदर्शनही करण्यात आले.
नायब तहसीलदार कुलथे यांनी शाळेने राबविलेल्या उपक्रमाचे कौतुक करून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. शिक्षणाधिकारी शबाना शेख यांनी प्रशासन व शैक्षणिक संस्थेच्या समन्वयातून विद्यार्थ्यांना योजनांचा लाभ मिळत असल्याचे सांगितले. प्रमाणपत्रे सहज उपलब्ध झाल्याने विद्यार्थ्यांनी जबाबदारीने शिक्षण घेऊन शाळा, गाव व तालुक्याचे नाव उज्ज्वल करावे, असे आवाहन त्यांनी केले.
संस्थेचे सदस्य राजेश ठोळे यांनी हा उपक्रम ‘शासन आपल्या दारी’ संकल्पनेचा उत्तम नमुना असल्याचे सांगत विद्यार्थ्यांसाठी प्रमाणपत्रांचे महत्त्व स्पष्ट केले. डॉ. अमोल अजमेरे यांनी पूर्वी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी होणाऱ्या अडचणींची तुलना सध्याच्या डिजिटल प्रक्रियेशी करून त्यातील सुलभता अधोरेखित केली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक मकरंद निमोणकर व उपमुख्याध्यापिका वर्षा आगरकर यांचे मार्गदर्शन लाभले. सूत्रसंचालन अर्चना वाणी यांनी केले.

COMMENTS