Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कुलूपबंद काँग्रेस कार्यालयामुळे कार्यकर्त्यांत नाराजी; केरळ विजयाचाही उत्साह गायब

नांदेड : एकेकाळी कार्यकर्त्यांच्या गर्दीने गजबजणारे शहर काँग्रेसचे नवा मोंढा येथील कार्यालय सध्या ओस पडले असून, कार्यालयावर कायमस्वरूपी कुलूप दिस

जि.प. मध्ये खा. अशोकराव चव्हाण यांची मॅरेथॉन बैठक, प्रशासनाची झाडाझडती
श्री बालाजी नगर नामफलकाचे अनावरण उत्साहात संपन्न
शेवगाव पोलीस स्टेशनमध्ये तक्रार निवारण दिन उत्साहात संपन्न

नांदेड : एकेकाळी कार्यकर्त्यांच्या गर्दीने गजबजणारे शहर काँग्रेसचे नवा मोंढा येथील कार्यालय सध्या ओस पडले असून, कार्यालयावर कायमस्वरूपी कुलूप दिसत असल्याने पक्षातील अंतर्गत विस्कळीतपणा पुन्हा चर्चेत आला आहे. पक्षाचे स्थानिक नेतृत्व आणि पदाधिकार्‍यांकडून कार्यालयीन कामकाजाकडे होत असलेल्या दुर्लक्षामुळे कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
शहर व जिल्हा काँग्रेसमधील समन्वयाचा अभाव, गटबाजी आणि कार्यालयीन व्यवस्थापनातील अनास्था यामुळे पक्षाचे संघटनात्मक अस्तित्व कमकुवत होत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. नवा मोंढा येथील सुसज्ज कार्यालय हे पूर्वी कार्यकर्त्यांच्या बैठका, जनसंपर्क, निवडणूक नियोजन आणि सामाजिक प्रश्नांवरील चर्चांचे प्रमुख केंद्र मानले जात होते. सकाळपासून रात्रीपर्यंत येथे कार्यकर्त्यांची वर्दळ असायची. मात्र गेल्या काही महिन्यांपासून कार्यालय नियमित सुरू राहत नसल्याची तक्रार पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून सातत्याने केली जात आहे. विशेष म्हणजे, केरळ विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला दहा वर्षांनंतर महत्त्वपूर्ण यश मिळूनही नांदेड शहरात पक्षाकडून कोणताही जल्लोष, फटाकेबाजी किंवा विजय उत्सव साजरा करण्यात आला नाही. त्यामुळे स्थानिक नेतृत्वाच्या निष्क्रियतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. दुसरीकडे, इतर पक्षांनी निवडणूक निकालानंतर शहरात जल्लोष आणि शक्तिप्रदर्शन करत राजकीय वातावरण रंगवले असताना काँग्रेस मात्र पूर्णपणे शांत दिसून आली. यामुळे काँग्रेसच्या संघटनात्मक ऊर्जेवरच प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. पक्ष कार्यालयातील दैनंदिन कामकाजासाठी कर्मचारी नियुक्त असूनही कार्यालय बहुतेक वेळा बंद राहत असल्याचा आरोप कार्यकर्त्यांकडून होत आहे. शहर आणि ग्रामीण भागातून विविध कामांसाठी येणार्‍या कार्यकर्त्यांना यामुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे सांगितले जात आहे. अनेकदा कार्यकर्ते कार्यालयात आल्यानंतर कुलूप पाहून परत जात असल्याने नाराजी आणखी वाढत आहे. दरम्यान, पक्षाचे खासदार प्रा. रविंद्र चव्हाण, जिल्हाध्यक्ष हनुमंत पाटील बेटमोगरेकर, शहराध्यक्ष अब्दुल सत्तार तसेच इतर वरिष्ठ पदाधिकारी कार्यालयीन व्यवस्थापनाबाबत स्पष्ट भूमिका घेत नसल्याची चर्चा आहे. स्थानिक पातळीवर पक्ष संघटना अधिक सक्रिय करण्याऐवजी अंतर्गत मतभेदांनाच खतपाणी घातले जात असल्याची टीका काही जुन्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेससमोर संघटन मजबूत करण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. पक्षाचे कार्यालयच बंद राहत असेल, तर सामान्य कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास कसा निर्माण होणार, असा सवालही उपस्थित केला जात आहे. नांदेडमध्ये काँग्रेसची संघटनात्मक ताकद टिकवून ठेवायची असेल, तर नेतृत्वाने कार्यकर्त्यांशी संवाद वाढवून कार्यालयीन व्यवस्थापन आणि पक्षीय हालचालींना नव्याने गती देण्याची गरज असल्याचे मत राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत.

COMMENTS