Homeताज्या बातम्या

महापौर कविता मुळे यांच्या पहिल्या 100 दिवसांचे रिपोर्ट कार्डपक्षश्रेष्ठी घेणार का अपयशाचा लेखाजोखा?

नांदेड : महापौर कविता मुळे यांच्या कार्यकाळातील पहिले शंभर दिवस पूर्ण होत असताना शहरातील मूलभूत प्रश्न मात्र जैसे थे असल्याचे चित्र दिसून येत आहे

राज्यात खाजगी कोचिंग क्लासेस विनियमन कायदा लागू करा; अन्यथा २९ जूनपासून आझाद मैदानावर आमरण उपोषण – गणेश दाढे
’स्वारातीम’ विद्यापीठाच्या प्रगतीशील उपक्रमांचा राज्यपालांकडून गौरव
संविधानातील मूल्ये तळागाळापर्यंत रुजविणे हेच खरे बाबासाहेबांना अभिवादन – मेघना कावली


नांदेड : महापौर कविता मुळे यांच्या कार्यकाळातील पहिले शंभर दिवस पूर्ण होत असताना शहरातील मूलभूत प्रश्न मात्र जैसे थे असल्याचे चित्र दिसून येत आहे. महायुतीच्या सत्तेतील महापालिकेकडून मोठ्या अपेक्षा बाळगणार्‍या नांदेडकरांच्या पदरी अद्याप आश्वासनांशिवाय फारसे काही पडले नसल्याची चर्चा शहरात रंगू लागली आहे. त्यामुळे महापौरांच्या पहिल्या शंभर दिवसांचे रिपोर्ट कार्ड पक्षश्रेष्ठी तपासणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
नांदेडची जीवनवाहिनी मानल्या जाणार्‍या गोदावरी नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न अद्यापही गंभीर स्वरूपात कायम आहे. नदीपात्रातील सांडपाणी, प्रदूषण आणि स्वच्छतेबाबत ठोस उपाययोजना करण्याची अपेक्षा असताना प्रत्यक्षात परिस्थितीत फारसा बदल झालेला दिसून येत नाही. गोदावरी स्वच्छतेचे आश्वासन घोषणांपुरतेच मर्यादित राहिल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. दुसरीकडे शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस अधिकच गंभीर होत आहे. प्रमुख चौक, बाजारपेठा आणि मुख्य रस्त्यांवर दररोज वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असून, वाहतुकीचे नियोजन करण्यामध्ये महापालिका आणि संबंधित यंत्रणा अपयशी ठरत असल्याची टीका नागरिकांकडून होत आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही कायम आहे. नियमित पाणीपुरवठ्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, शहरातील अनेक भागांमध्ये अजूनही पाच ते सात दिवसांनी पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून केल्या जात आहेत. वाढत्या उन्हाळ्यात आणि घटत्या जलसाठ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागत असल्याचे चित्र आहे. रस्त्यांची अवस्था तर आणखी बिकट झाली आहे. खड्डेमय रस्ते, रखडलेली दुरुस्ती आणि निकृष्ट दर्जाची कामे यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. शहरातील प्रमुख रस्ते असोत किंवा अंतर्गत भागातील मार्ग, सर्वत्र दुरवस्था कायम आहे. महापौर कविता मुळे यांच्या पहिल्या शंभर दिवसांत नागरिकांना दिलासा मिळण्याऐवजी समस्या अधिकच ठळकपणे समोर आल्या आहेत. त्यामुळे पक्षश्रेष्ठी या कामगिरीचा वस्तुनिष्ठ आढावा घेणार का, की केवळ राजकीय पाठराखणीतून अपयशाकडे दुर्लक्ष केले जाणार, याकडे आता नांदेडकरांचे लक्ष लागले आहे.

COMMENTS